सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडीपोलिस ठाण्याच्या कस्टडीतून तीन ठासणीच्या बंदुका चोरीस गेल्याप्रकरणी तब्बल तेवीस वर्षांनंतर सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बंदुका चोरीची घटना २००१ मध्ये घडली होती. बेकायदा शिकार करताना आढळून आल्याप्रकरणी संशयित यांच्याकडून तीन ठासणीच्या बंदुका तपासावेळी पोलिस ठाण्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवडणुका लागल्यामुळे या बंदुका पुन्हा ताब्यात घेऊन त्या कस्टडीत नेहमीप्रमाणे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. तक्रारदार रवींद्रनाथ गावकर यांना या तीन बंदुका शेती संरक्षणासाठी म्हणून देण्यात आल्या होत्या. सर्व कार्यवाही संपल्यावर त्यांनी आपल्या बंदुका परत मिळाव्यात यासाठी अर्ज केला असता त्या देण्यास सावंतवाडी पोलिसांनी असमर्थता दर्शविली. त्यानंतर गावकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या बंदुका मिळाव्यात यासाठी याचिका दाखल केली. यावर सावंतवाडी पोलिसांनी लेखी जबाब सादर करत त्या बंदुका कस्टडीतून गायब झाल्याची माहिती दिली. सावंतवाडी पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २३ वर्षांनंतर तीन बंदुका चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस कोठडीतून तीन बंदुकांची चोरी; तब्बल २३ वर्षांनी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:45 PM