सावंतवाडी : भारतीय बौध्द महासभा या संस्थेच्या पूर्वपरवानगीशिवाय या संस्थेच्या नावाने कुणी बौध्द पध्दतीने होणाऱ्या विवाहांसाठी आवश्यक असलेल्या विवाहकरार पत्रकाचा बेकायदेशीर वापर केल्यास तो विवाह बेकायदेशीर ठरेल, असा इशारा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंंधुदुर्गचे जिल्हा सचिव सिध्दार्थ कदम व जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित भारतीय बौध्द महासभेच्या अध्यक्षपदाचा गेली ३५ वर्षे चालू असलेला वाद २ फेबुु्रवारी २०१५ रोजी विश्वासितांच्या बाजूने निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयाने संपुष्टात आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानात लिहून ठेवले आहे की, ‘इंडिया’ म्हणजेच भारत त्याच पध्दतीने ‘दी बुध्दिस्ट सोसायटी आॅफ इंडिया’ म्हणजेच मराठीत ‘भारतीय बौध्दमहासभा’ होय. शब्दच्छल करून हँडबिले, पावतीपुस्तके छापून जनतेची फसवणूक करतील, म्हणून या जिल्ह्यातील टीव्ही चॅनेलवरून आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी एका तालुक्यापुरता मर्यादित असलेल्या संघटनेशी संगनमत करून आचरा फेस्टिवल करण्यात आला. आता कणकवली महाल संघाला फसविण्याचा प्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कणकवली महाल संघाचे अध्यक्ष व सचिव यांना लेखी स्वरूपात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कणकवली महाल संघाने याचीगांभीर्याने नोंद घेऊन अशा तथाकथित नेत्यांपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)
...तर ‘तो’ विवाह बेकायदेशीर ठरेल
By admin | Published: May 22, 2016 12:24 AM