कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरसिंधुदुर्गात कणकवली तालुक्यातील ओसरगाव व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील हातिवले या दोन ठिकाणी टोलनाके सुरू करण्यासंदर्भात यापूर्वीच निविदा प्रक्रिया झाली होती. राजापूर येथील टोल वसुली काल, मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, ओसरगाव येथील टोलवसुलीबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. ओसरगाव टोलवसुली सुरू न झाल्याने व काढण्यात आलेल्या निविदेची मुदत तीन महिनेच असल्याने आता ओसरगावसाठी पुन्हा निविदा काढली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी ओसरगाव येथील टोल वसुलीची निविदा प्रक्रिया पूर्ण होत ठेकाही देण्यात आला होता. कंपनीकडून टोल वसुलीच्या अनुषंगाने कार्यवाही होण्यापूर्वीच सर्व राजकीय पक्ष व नागरिकांकडून या टोल वसुलीला जोरदार विरोध झाला. सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना १०० टक्के टोलमाफी व मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली करण्यात यावी अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतल्याने ही टोलवसुली थांबली होती.दरम्यान, त्यावेळी काढण्यात आलेल्या निविदेची मुदत तीन महिन्यांसाठी होती. त्यानंतर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता होती. मात्र, या कालावधीत टोल वसुली सुरू न झाल्याने व निविदेची मुदत संपल्याने 'रिटेंडर' होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओसरगाव येथील टोल वसुलीबाबत अजूनही संभ्रमावस्था असून नागरिक टोल वसुली विरोधात संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.
सिंधुदुर्गातील ओसरगाव येथील टोल वसुलीबाबत अजूनही संभ्रमावस्था
By सुधीर राणे | Published: April 12, 2023 12:51 PM