सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका इंदिरा गांधी संकुलातील नऊ गाळेधारकांचे गाळे चोवीस तासात काढून घेणार, असा इशारा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शुक्रवारी सभागृहात दिला होता. मात्र, चोवीस तास उलटूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पालिकेचा इशारा हवेत विरल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे. दरम्यान, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी त्या नऊ गाळ्यांचा नव्याने सर्व्हे केला आहे. सावंतवाडी नगरपालिकेने इंदिरा गांधी संकुलातील ३९ गाळ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. यातील ९ गाळ्यांवर तातडीने कारवाई करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते, तशी घोषणा नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिका बैठकीत केली होती. ज्या गाळेधारकांनी गाळ्यांचे नियम पायदळी तुडवले आहेत. त्यांच्यावर येत्या २४ तासात कारवाई करणार आहोत. यात ९ गाळेधारकांचा समावेश आहे. तर अन्य ३० गाळेधारकांनी गाळ्याची भिंत तोडली असून त्यांनाही पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील पंधराजणांनी लेखी उत्तरे दिली पण त्यावर पालिका समाधानी नसून त्यांच्यावर काही अंतराने कारवाई केली जाणार आहे. मात्र, ज्या नऊ गाळ्यांवर चोवीस तासात कारवाई करण्यात येणार होती त्याबाबत शहरात कमालीची उत्सुकता होती. नगराध्यक्षांच्या घोषणेनंतर २४ तास उलटून गेले तरी पालिकेने या गाळेधारकांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले. सायंकाळी पालिकेचे अभियंता तानाजी पालव, वरिष्ठ लिपिक आसावरी शिरोडकर, जयप्रकाश कदम, बाबू पिंगुळकर आदींनी ज्या नऊ गाळेधारकांवर कारवाई करायची आहे तसेच ते गाळे ताब्यात घ्यायचे आहेत. त्याचे पुनसर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षण सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पण कारवाईबाबत बोलण्यास तयार नव्हते. त्यामुळे चोवीस तास उलटल्यानंतर पालिकेची घोषणा हवेत विरल्याची चर्चा सावंतवाडीत व इंदिरा गांधी व्यापारी संकुलात सुरू होती. (प्रतिनिधी)
चोवीस तासानंतरही कारवाई नाही
By admin | Published: March 15, 2015 12:24 AM