चिपळूण : शिवसेना-भाजपची गेली २५ वर्ष युती आहे. युतीत कोणताही वाद नाही. एखाद्या विषयावर आमचे एकमत नसणे हा काही वाद नाही. जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांची व आमची भूमिका एकमेकांना माहित आहे. त्यामुळे तो काही वादाचा मुद्दा नाही असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले. भारतीय जनता पक्षाचे राज्यभर महासंपर्क अभियान सुरु आहे. याची सुरुवात कोकणातून होत आहे. महाड, चिपळूण व कुडाळ असे तीन ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. आपला हा दोन दिवसाचा कोकण दौरा असून राज्यात भाजपाने १ कोटी ५ लाख सदस्य नोंदणी केली आहे. आता या सदस्यांशी संपर्क अभियान सुरु केले आहे. आम्ही घरोघरी जावून त्यांच्याशी संपर्क करणार आहोत. त्यांची माहिती घेवून ओळख करुन घेणार आहोत. सरकार व पक्ष यांच्यात समन्वय साधून भविष्यात भाजपच्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचा फायदा होईल असे दानवे यांनी स्पष्ट केले. सेना-भाजप वादाबाबत ते म्हणाले, आमच्यात वादच नाहीत. जैतापूर प्रकल्पाबाबत दोन वेळा बैठका झाल्या. जैतापूरबाबतची आमची भूमिका शिवसेनेला माहित आहे. हा प्रकल्प आम्ही पूर्ण करणारच त्याला त्यांचा विरोध आहे. वीजेची मागणी व पुरवठा यामध्ये साम्य राखायचे असेल तर जैतापूर प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामध्ये कोणता मुद्दा त्यांचा अडचणीचा आहे याबाबत आम्ही शिवसेनेशी सुसंवाद साधू, चर्चा करु व पंतप्रधानांकडे ते मांडू, परंतु, आमच्यात यावरुन वाद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोकणातही भाजप विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सेना-भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत : दानवे
By admin | Published: June 23, 2015 12:48 AM