अनंत जाधव - सावंतवाडी माजीमंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्मारक दोन एकर जागेत सावंतवाडी शहरात करण्यात यावे, अशी सूचना राज्याचे अप्पर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी केली होती. मात्र, एवढी मोठी शासकीय जागा शहरात नसल्याचा अहवाल येथील तहसीलदार विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून, भाईसाहेब सावंत यांचे स्मारक आता माजगाव येथेच करावे लागणार आहे. तशी इच्छा विकास सावंत यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.सिंधुदुर्गमध्ये मंत्रीमडळ बैठक झाली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. यावेळी जाहीर केलेल्या कोकण पॅकेजमध्ये तशी तरतूदही केली होती. मात्र, गेली ९ वर्षे या स्मारकासाठी जागा हस्तांतरण करण्यात आली नाही. माजगाव येथेच स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी भाईसाहेब सावंत कुटुंबीयांनी केली होती. त्यासाठी जागाही देऊ केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या जागेचे हस्तांतरण झाले नाही.दरम्यान, अलिकडेच जिल्हा दौऱ्यावर आलेले अप्पर मुख्य सचिव पी. एस. मीना यांनी भाईसाहेब सावंत यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी कोकणच्या विकासात मोलाचा वाटा उचलला असून, त्यांचे स्मारक भव्य-दिव्य झाले पाहिजे. त्यासाठी शहरात दोन एकर शासकीय जागा शोधण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिले होते.अप्पर मुख्य सचिवांनी या स्मारकात व्यक्तीश: लक्ष घालून या जागेत हॉल, कॉम्प्युटर लॅब, वाचनालय आदींची तरतूद आराखाड्यात करण्याचे सुचविले होते. येथील प्रशासनाने या स्मारकासाठी खास जागा शोधण्याचे काम सुरू केले होते. मात्र, या ठिकाणी एकही शासकीय जागा नसून, काही जागा शिल्लक आहेत; मात्र या जागांवर देवराई तसेच स्मशानभूमीची आरक्षणे असल्याचे पुढे आले आहे. या व्यतिरिक्त सावंतवाडीवाडी शहरात एकही जागा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तहसीलदारांनी तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून, या अहवालात जागा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे स्मारक भाईसाहेब सावंत कुटुंबाच्या मागणीनुसार माजगाव येथेच उभारावे लागणार आहे. सावंत कुटुंबाने आहे त्यापेक्षा जास्त जागा देण्याचेही मान्य केले आहे. त्यांची तशी चर्चाही प्रशासनाशी झाल्याचे तहसीलदार बी. बी. जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशासनाची इच्छा असली, तरी भाईसाहेब सावंत यांचे स्मारक सावंतवाडी शहरात होणे सध्या तरी अशक्य असून, प्रशासनाला माजगाव हाच पर्याय ठरणार आहे. \शासकीय जागाच उपलब्ध नाही : बी. बी. जाधव४भाईसाहेब सावंत यांचे स्मारक सावंतवाडी शहरात करण्याबाबत तहसीलदार बी. बी. जाधव म्हणाले, आम्ही सर्व ठिकाणी जागेची चाचपणी केली. ४पण अद्याप शासकीय जागाच मिळाली नसून अनेक जागांची पाहणी केली आहे.४मात्र, त्या जागांवर देवराई व स्मशानभूमीची आरक्षणे असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
भाईसाहेब स्मारकासाठी शासकीय जागाच नाही
By admin | Published: November 17, 2015 10:23 PM