सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात एकही अति व संवेदनशील केंद्र नाही. तरी प्रत्येक तालुक्यांत एक याप्रमाणे आठ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी ९५ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी व होमगार्ड मिळून १२७९ पोलिस फौजफाटा व प्रत्येकी दोन राज्य राखीव दल, दंगल कृती दल व शीघ्र कृती दलाची पथके तैनात करण्यात येणार आहेत. ८३८ मतदान केंद्रांवर ३६८८ प्रशासकीय कर्मचारी काम पाहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.आचारसंहितेच्या कालावधीत ८६ जणांवर अवैध दारू वाहतूक व दारू बाळगल्याप्रकरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ३५ लाख ३ हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ५ लाख ६३ हजार ६३२ मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २ लाख ८० हजार ९२ पुरुष तर २ लाख ८३ हजार ५४० स्त्री मतदारांचा समावेश आहे. सर्व मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यातील ५० टक्के मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित चिठ्ठ्यांचे वाटप १९ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यात ८३८ मतदान केंद्रे असून, या प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी याप्रमाणे एकूण चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या मतदान केंद्रांवर मतदान कर्मचारी व मतदान साहित्याची ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून १०२ बससेवेला राहणार आहेत. तसेच पोलिस विभागाला एकूण ४० खासगी वाहने तसेच ३ लाईट व्हॅन अधिग्रहण करून देण्यात आलेल्या आहेत. (प्रतिनिधी)३६८८ कर्मचारी निवडणुकीचे काम पाहणारजिल्ह्यातील ३६८८ शासकीय कर्मचारी निवडणुकीचे कामकाज पाहणार आहेत. यामध्ये वैभववाडी तालुक्यामध्ये २७२ कर्मचारी, कणकवली -५५६, देवगड-५३२, मालवण-४६०, कुडाळ-६३२, वेंगुर्ले-३८०, सावंतवाडी-६०८, दोडामार्ग-२४८ या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन निवडणुकीदिवशी त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. आठ चेकपोस्टवर सीसीटीव्हीची नजरजिल्ह्यात २० चेकपोस्ट आहेत. त्यापैकी गोवा, कर्नाटक राज्यांच्या सीमेवर यामध्ये वीजघर, इन्सुली, आरोंदा, सातार्डा, आंबोली, रेडी, खारेपाटण, करूळ या चेकपोस्टवर स्थायी सर्वेक्षण पथके स्थापन करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या पथकामध्ये एक वाहन, एक व्हिडिओग्राफर, एक हत्यारबंद पोलिस यांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय अधिकारी तथा क्षेत्रीय दंडाधिकारी उपलब्ध असतील. या चेकपोस्टवर सर्व वाहनांची कसून तपासणी करून संशयास्पद हालचालींवर गस्त ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात संवेदनशील केंद्र नाही
By admin | Published: February 18, 2017 11:59 PM