सिंधुदुर्ग : मोदीमुक्त भारत झालाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. पालघरमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणून हिंदूंची मते काही बदलणार नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. राज्यात प्रादेशिक तर केंद्रात राष्ट्रीय पक्षांची सत्ता असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत त्यांनी यावेळी मौन पाळले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मंगळवारपासून नियोजित कोकण दौरा सुरू झाला आहे. त्यांनी सावंतवाडी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ््या विषयांवर रोखठोक मते मांडली. कोकणी जनतेने हिसका दाखविला तरच येथील प्रलंबित प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे कोकण नेते शिरीष सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया मेहता, बाबल गावडे, दीपक गावडे, राजू टंगसाळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या ठाकरे शैलीत राज यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ््या प्रश्नांना रोखठोक उत्तरे दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना या ठिकाणी अपघात होऊन पाच जणांचे बळी गेले, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र याकडे महामार्ग प्रशासन व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत आहे. यावर ठाकरे म्हणाले की, जर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी रहात असते तर येथील महामार्गाचे काम लवकर झाले असते.बुलेट ट्रेन व मुंबई-बडोदा महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. सहा ते सात वर्षे हे काम सुरू आहे, त्याचे काय? कोकणी जनतेने हिसका दाखविला पाहिजे. तो दाखविला जात नसल्यानेच येथील प्रश्न प्रलंबित आहेत, असे त्यांनी सांगितले.पालघर येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी येत आहेत, या प्रश्नावर आदित्यनाथांच्या कुठेही जाण्याने काहीही फरक पडत नाही. हिंदू मतांचा काय संबंध? योगी हिंदू मते फिरवू शकतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या सत्ता स्थापनेवर राज म्हणाले की, केंद्र्रात काहीही होऊ दे, पण राज्यात प्रादेशिक पक्षच हवा. कारण प्रादेशिक पक्षांनाच राज्याच्या अस्मितेची आणि येथील प्रश्नांची जाण असते. त्यामुळे राज्यात राष्ट्रीय पक्षांना स्थान मिळता कामा नये. सिद्धरामय्यांनी कर्नाटकात जे करून दाखविले ती हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का दाखवित नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रादेशिक पक्षाचा महाराष्ट्रात विचार झाला असता, तर नाणारमध्ये परप्रांतीयांच्या जमिनी घेण्याची हिंमत झाली नसती. मनसेचे सरकार असते तर अशी हिंमत परप्रांतीयांनी केली असती का, असा सवालही त्यांनी केला.मोदींची लाट ओसरली असे वाटते का? असा थेट सवाल ठाकरे यांना केला असता ते म्हणाले, मोदीमुक्त भारत हवाच. गुजरातमधील निकालावरून मोदींची लाट ओसरली असे वाटते. माझा त्या ई.व्ही.एम. मशीनवर संशय आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही या मशीनबाबत संशय होता, असेही त्यांनी सांगितले.