वैभववाडी (सिंधुदुर्ग) : अरुणा प्रकल्पाच्या पाण्यातून वर्षभरापूर्वी काही मानकऱ्यांनी बाहेर काढलेली भोमच्या गांगो मंदिरातील ३१ पाषाणे अखेर पोलिसांच्या समक्ष पोलिस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली. या पाषाणासंदर्भात एका गटाने पोलीस आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर समितीने हा निर्णय घेतला.भोम येथील श्री देव गांगोमंदिर अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्याखाली गेले. त्यामुळे या मंदिरातील ३१ पाषाणे जून २०१९ पासून पाण्यातच होती. गेल्यावर्षी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला होता. त्याचवेळी मानकरी आणि वहिवाटदार डॉ. व्यंकटेश जामदार, सुभाष जाधव, आदिनाथ जाधव, आणि पुजारी रामकृष्ण कदम यांनी गांगोमंदिरातील पाषाणे पाण्यातून बाहेर काढली. त्यानंतर सहा महिन्यांनी गावातीलच महादेव जामदार, विलास कदम यांच्यासह काहींनी देव चोरीस गेल्याची तक्रार पोलिसात दिली होती. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे तक्रार केली होती.याबाबत देवस्थान समितीने ही गांगोमंदिरातील पाषाणे प्रशासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वैभववाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या उपस्थितीत मानकऱ्यांनी आपल्या ताब्यात असलेली सर्व ३१ पाषाणे पोलिस पाटील संतोष मानाजीराव गुरव यांच्या ताब्यात दिली.
पुर्वजांचा अनमोल ठेवा जतन व्हावा हीच भावनागांगो मंदिरातील पाषाणे आम्ही मानकऱ्यांनी निःस्वार्थी हेतूने पाण्याबाहेर काढली. पुर्वजांचा अनमोल ठेवा पुढील पिढीसाठी स्थापित करावा हीच आमची त्यामागे भावना होती. याची कल्पना आम्ही पोलिस पाटील, सरपंच आणि गावातील काही प्रमुखांना दिली होती. मात्र काही लोकांनी देव चोरीला गेले अशी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ही पाषाणे आता आम्ही पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द केली आहेत, असे मत देवस्थानाचे मानकरी डॉ. व्यंकटेश जामदार यांनी व्यक्त केले.