कणकवली : राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. राज्य सरकारने त्याबाबत संमती दर्शविणारे पत्र केंद्र सरकारला दिले आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. कणकवली येथिल भाजप कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली पंचायत समिती उपसभापती मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये, नगरसेवक शिशिर परुळेकर, कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार म्हणाले, बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प केला जाणार आहे. केंद्र सरकारला राज्य सरकारने तशी संमती दिली आहे. याबाबत आम्ही केंद्रीय मंत्र्यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जाऊन लवकरच भेट घेणार आहोत. केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. केंद्र सरकार त्यावर काम करत आहे.
कोकणात जे काम खासदार विनायक राऊत यांनी केले पाहिजे होते ते करू शकले नाहीत. मात्र, भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणात फार मोठया प्रमाणात विकास कामे होत आहेत. राणेंमुळे कोकणात जसा भाजपा शतप्रतिशत झाला तसा विकासही शतप्रतिशत होणार आहे. मोदी सरकारच्या कामाचा भाजपने पाठपुरावा केला आणि मुंबई ही आर्थिक राजधानी व गोवा ही पर्यटन राजधानी अशी मोठी शहरे महामार्गाने जोडली. देवगड आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रकल्प उभारून विजयदुर्ग बंदर रेल्वेने जोडले जाईल. त्याचा पाठपुरावा यापुढे आम्ही करणार आहोत असेही ते म्हणाले.