रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीत सापडलेले गावठी बॉम्ब हे रानटी प्राणी, तसेच मासे मारण्यासाठी वापरले जात होते. त्यामागे दहशतवादी कृत्याचा कोणताही उद्देश नसल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली. हे हातबॉम्ब वापरून प्राण्यांची शिकार करणाऱ्यांचाही तपास होणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेतसंयुक्त कारवाईत कुंभारखणी संगमेश्वर येथील एका घरावर छापा टाकला असता घरातील कपाटात ११६ गावठी बॉम्ब व ६५० ग्रॅम वजनाची पांढऱ्या रंगाची पावडर, असा ६९,६०० रुपयांचा बेकायदा मुद्देमाल आढळला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी संजय गणपत कांबळे (४८) याला अटक करण्यात आली होती. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी खुर्द या ठिकाणी गावठी हातबॉम्ब तयार करून जंगली प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार डॉ.शिंदे यांनी अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस व सहकार कर्मचाऱ्यांचे एक खास पथक तयार केले. या पथकानेच या हातबॉम्ब प्रकरणाचा छडा लावला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी संजय कांबळे याने हे हातबॉम्ब आपण रानटी प्राण्यांची शिकार करण्यासाठी तयार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात बारी पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४, ५ व भारतीय दंडविधान २६८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत. या मोहीमेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सहाय्यक फौजदार सुभाष माने, तानाजी मोरे, दिनेश आखाडे, वैभव मोरे, चालक डि.आर.कांबळे व संगमेश्वर पोलिसांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)संजय गुन्हेगारी प्रवृत्तीचा...संजय कांबळे याच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची मेहुणीही त्याच्याकडे पत्नीसारखीच राहत होती. त्यांच्यातील अनैतिक संबंधातून ती गरोदर राहिल्याने आपली अबू्र जाईल म्हणून संजय याने मेहुणीचा जून २०१० मध्ये दोरीने गळा आवळून खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मात्र, या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी नसल्याने न्यायालयातून ही केस निकाली निघाल्याची माहितीही या प्रकरणामुळे पुन्हा समोर आली आहे.प्राण्यांची बेसुमार हत्याकांबळे याने बनविलेले हे हातबॉम्ब जंगलामध्ये खाद्यपदार्थात लपवून ठेवले जात. प्राण्याने हे खाद्य खाण्याचा प्रयत्न करताच बॉँम्बचा स्फोट होऊन प्राणी जखमी होणे वा मरणे असे प्रकार होत असत. नंतर त्या प्राण्याच्या मांसाची विक्री केली जात होती. या छुप्या व्यवसायामुळे जंगली प्राण्यांची बेसुमार हत्या सुरू होती. मासेमारीसाठीही असे हातबॉम्ब वापरले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
‘ते’ हातबॉम्ब प्राण्यांच्या शिकारीसाठीचे
By admin | Published: March 17, 2016 11:22 PM