वेंगुर्ले : वेंगुर्ले-उभादांडा बागायतवाडी येथील श्री देव कोठारेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगट हा तालुक्यात अल्पावधीतच नावारूपास येऊन लक्षवेधी ठरलेला बचतगट म्हणून कार्यरत आहे. काथ्यापासून विविध गृहोपयोगी वस्तू व दर्जेदार मसाला यामुळे स्थानिक बाजारपेठेबरोबरच चाकरमान्यांचीही गटातील उत्पादित वस्तूंना मागणी दिवसेंदिवस वाढत असून, गटाची वाटचाल प्रगतीपथावर आहे.उभादांडा-बागायतवाडी येथील महिलांनी एकत्र येत २२ फेबु्रवारी २००७ रोजी श्री देव कोठारेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटाची स्थापना केली. या बचतगटाची धुरा नम्रता गवंडे यांनी सांभाळत बचतीबरोबरच गटातील सदस्यांना काम मिळावे व दैनंदिन खर्च भागवता यावा, यासाठी गटामार्फत उद्योग-व्यवसाय करण्याचा निर्धार केला. वेंगुर्लेत काथ्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात होऊन त्यापासून आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने हा व्यवसाय निश्चित करण्यात आला. वेंगुर्ले येथील महिलांनी काथ्या कामगार औद्योगिक संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन काथ्यापासून दोरी, पायपुसणी, झाडू, शोभिवंत वस्तू अशा वस्तूंचे उत्पादन केले. यासाठी युनियन बँक वेंगुर्ले शाखेकडून दोन लाखाचे कर्ज घेऊन काथ्या व्यवसाय सुरू करण्यात आला. बँकेच्या कर्जाची परतफेड करून आता नवीन कर्ज उचल केली आहे. पारंपरिक व्यवसाय काथ्या असल्याने या व्यवसायाची निवड केली. मात्र, सहकार क्षेत्रातील एम. के. गावडे व काथ्या कारखाना संचालिका प्रज्ञा परब यांनी या व्यवसायात आधुनिकीकरण आणून व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन केल्याने आज विविध आकर्षक वस्तू काथ्यापासून बनविण्यात येऊ लागल्या. कोठारेश्वर बचतगटाच्या उत्पादनांकडे स्थानिकांबरोबरच पर्यटकही आकर्षित होऊ लागले आणि अत्यल्प दिवसातच या बचतगटाची यशशिखराकडे वाटचाल सुरू झाली. गटातील प्रत्येक महिला सामाजिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त भाग घेत असतात. कोठारेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगटात अध्यक्ष नम्रता रमाकांत गवंडे, उपाध्यक्ष मंगला केशव रेवणकर, सचिव गौरी महेश बागायतकर यांच्यासह सदस्य प्रतिभा नारायण वेंगुर्लेकर, पार्वती महादेव तुळसकर, राजश्री रंगनाथ गवंडे, प्रभावती प्रकाश तुळसकर, दीपाली दिनकर तुळसकर, वनिता नरेंद्र बागायतकर, स्नेहल सतीश मयेकर आदी उपस्थित होते. जाहिरातीशिवायप्रतिसाद४काथ्याबरोबरच त्याला जोडधंदा म्हणून मसाला गटातील महिला तयार करू लागल्या. ‘सिंधु’ या नावाने उत्पादित केलेला मसाला रूचकर व चविष्ट असल्याने याची विक्रीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली. ४दरवर्षी गणेश चतुर्थीला येणारे चाकरमानी आमच्या गटाकडून उत्पादित मसाला वर्षभरासाठी विकत घेतात. कुठलीही जाहिरातबाजी न करता या मसाल्याच्या मागणीला जोर वाढू लागला आहे. ४महिला काथ्या, पंचायत समितीतील गटविकास अधिकारी माधुरी परीट व विस्तार अधिकारी मनोज बेहेरे यांचे मार्गदर्शनही या गटासाठी महत्त्वाचे ठरत आहे.२००७ मध्ये स्थापन झालेल्या आमच्या गटाने पारंपरिक काथ्या व्यवसायाची सुरूवात करून दैनंदिन वापरातील मसाला उत्पादित केला. ‘सिंधु’ या नावाने विक्रीस असलेल्या या मसाला पदार्थास स्थानिकांसह चाकरमान्यांकडून मोठी मागणी आहे. गटातील सदस्यांची वेळोवेळी मिळणारी मदत हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते.- नम्रता गवंडे, अध्यक्षा श्री देव कोठारेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचतगट, उभादांडा.
काथ्या व्यवसायातून त्यांनी घेतली भरारी
By admin | Published: January 09, 2016 11:57 PM