दोडामार्ग : काजू बीच्या कमी झालेल्या दराचा फायदा उठवित चढ्या दराने काजू बी खरेदी करून जादा दर देण्याचे आमिष दाखवून गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना २३ लाख २१ हजार ७६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आपल्यासह इतर १९ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. त्यानुसार दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे (रा. पिसुलै, फोंडा गोवा) या बंटी-बबलीच्या जोडीवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजू बागायतदार आहेत. गेल्या दहा वर्षांत भातशेतीसोबतच तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र हे काजू लागवडीखाली आले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचे बहुतांशी अर्थकारण हे काजूवर अवलंबून आहे. त्यातच मागील चार वर्षांत काजूला चांगला दर मिळाल्याने शेतकरी फायद्यात होते. मात्र, हाच दर चालू वर्षी गडगडला.
गेल्या वर्षाच्या तुलनेत काजूबीचा प्रति किलोमागे दर यावर्षी ४० रुपयांनी कमी होता. बहुतांशी ठिकाणी चालू हंगामात १३० रुपये किलो या दराने काजू खरेदी केली. मात्र, इतर कारखानदारांपेक्षा चढ्या दराने काजू बी खरेदी करण्याचे आमिष गोव्यातील बंटी-बबलीच्या जोडीने दोडामार्ग तालुक्यातील शेतकºयांना दाखविले. तालुक्यातील काजू बागायतदारांनी या आमिषाला बळी पडून आपली काजूबी त्यांना दिली.काजू बी खरेदी करताना दिव्या रुसेल ओबेरॉय व मल्लिकार्जुन हरी गावडे यांनी प्रथम शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांना पैसेही व्यवस्थित दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवून काजूबी विक्री केली.झरेबांबर विमानतळ येथील लक्ष्मण पांडुरंग मोरजकर यांनी आपल्याकडील २० लाख २१ हजार ९१५ रुपयांची काजू बी विक्री केली. त्यापैकी त्यांना ८ लाख २५ हजार रुपये टप्प्याटप्प्याने देण्यात आले. तर उर्वरित ११ लाख ९६ हजार ९१५ रुपये शिल्लक राहिले. मात्र त्यानंतर संबंधित काजूबी खरेदी करणाऱ्या बंटी-बबलीचा मोबाईल स्वीच आॅफ झाला. त्यांनी आपला पत्ता दिला होता त्याठिकाणी ते दोघे वास्तव्यास नसल्याचे समोर आले आले.गंडा घातल्याप्रकरणी तक्रार दाखललक्ष्मण मोरजकर यांनी अखेर बुधवारी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय मोरजकर यांच्या व्यतिरिक्त तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांची ११ लाख २४ हजार ८५३ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गोव्यातील बंटी-बबलीच्या या जोडीविरुद्ध शेतकºयांना २३ लाख २१ हजार ७६८ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा पाटील करीत आहेत.