सिंधुदुर्गनगरी : कामबंद आंदोलनात सहभागी होणाऱ्या संपकरी डॉक्टरांना मेस्मा कायद्याअंतर्गत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार अद्यापपर्यंत काही डॉक्टर कामावर रुजू झाले आहेत. उर्वरित कामावर हजर न झालेल्या संबंधित डॉक्टरांवर शासन निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी लोकशाही दिनाच्या आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी ई. रविंद्रन बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आजच्या लोकशाही दिनात ६ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय- ४, नगरपरिषद- १, पणन विभाग- १ आदी तक्रारींचा समावेश आहे. संबंधित अर्ज उचित कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी संघटनेचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ई. रविंद्रन म्हणाले, कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या अस्थायी डॉक्टरांच्या सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना मेस्मो कायद्यांतर्गत २४ तासात सेवेत हजर होण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही डॉक्टर सेवेत रुजू झाले आहेत. उर्वरित हजर न राहिलेल्या डॉक्टरांवरील कारवाईबाबत शासन निर्देश प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी ठेवली असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिली.दरम्यान, जिल्ह्यात छोट्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळत असते. यावर आपले लक्ष असून संबंधितांवर कारवाईसाठी मोहिम आखण्यात आली असल्याचेही ई. रविंद्रन यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई करणार
By admin | Published: July 08, 2014 12:38 AM