कणकवली : पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवलीतील सर्व्हिस रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्यासंदर्भात नागरिकांना शब्द दिला होता. पण अद्याप पुतळ्याचे स्थलांतरण झाले नसल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी उपोषणाचा पर्याय निवडला आहे. या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर हल्लाबोल चढवला. शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे राज्य सरकार असल्याची टीका आमदार राणे यांनी केली.कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर भाजपच्यावतीने सुरू असलेल्या उपोषणाला आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला. उपोषणस्थळी त्यांनी भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. यावेळी ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या शब्दाला जर प्रशासन किंमत देत नसेल तर कायदा व सुव्यवस्था राखणे ही केवळ आमची जबाबदारी नाही. जर आम्ही रातोरात पुतळा हलवला आणि योग्य जागी बसवला तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे नाहीत, असा इशारा देखील आमदार राणे यांनी दिला.जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर...छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा आम्हाला कोणी मोठे नाही. पालकमंत्र्यांची राज्य सरकार मध्ये काय किंमत आहे? ते बघण्यासाठी अजून पर्यंत आम्ही थांबलो होतो. मात्र, आता थांबणार नाही. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईपर्यंत आम्ही काही हात बांधून गप्प बसत पाहत राहणार नाही. आमच्या पदाची आम्हाला चिंता नाही. पुतळा स्थलांतरित करण्याच्या मुद्द्यावरून जर जिल्ह्यात तांडव निर्माण झाले तर आमची त्याला तयारी आहे. असा इशारा देखील राणे यांनी दिला.यावेळी भाजपचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण राजश्री धुमाळे, साक्षी वाळके, पप्पू पुजारे, शिवसुंदर देसाई, अभय घाडीगावकर, संदीप सावंत, राजू हिर्लेकर, राजन चिके, महेश सावंत, अभिजीत मुसळे, बंडू गांगण, संजय ठाकूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे आदी उपस्थित होते. यावेळी पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची देखील आमदार राणे यांनी पाहणी केली.
Nitesh Rane: शिवरायांना नव्हे हे तर औरंगजेबला मानणारे, आमदार नितेश राणेंचे राज्य सरकार टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 3:36 PM