कणकवली : असलदे -पियाळी पुलावर जीवंत खवले मांजराची तस्करी करून विक्रीच्या प्रयत्नात असताना सहा आरोपींच्या रॅकेटला वनविभाग व गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले होते। या प्रकरणातील सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने आरोपींच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होऊन त्या आरोपींचा जामिनअर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
त्या आरोपींमध्ये शरद काष्टे (रा़ .संगमेश्वर रत्नागिरी), गणपत घाडीगांवकर, सचिन घाडीगांवकर (दोघेही रा़ दिवा ठाणे), नरूद्दीन शिरगावकर (मणचे, देवगड), प्रकाश गुरव (रा़ साळीस्ते, कणकवली), प्रविण गोडे (रा.गोवळ देवगड) या सहा जणांचा समावेश आहे़. सध्या या आरोपींची रवानगी सावंतवाडी तुरूंगात करण्यात आली आहे.
कणकवली न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान खवले मांजर हे दुर्मिळ प्राण्यांमध्ये अनुसूचि एक मध्ये येत आहे.या दुर्मिळ प्राण्याची तस्करी करण्याचा प्रयत्न सहा आरोपींनी संगनमताने केला होता.आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून या आरोपींना जामिन मंजूर करू नये, असा युक्तीवाद सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी केला. त्यानुसार कणकवली न्यायालयाने त्या आरोपींचा जामिन अर्ज फेटाळला आहे.