सावंतवाडी - मंत्रालयात कधीही न जाणारे आज उद्योगाबददल बोलतात हे बघून आर्शचय वाटते हे सर्व उद्योग जनतेची माथी भडकवण्याचे असून एवढेच असेल तर त्यांनी रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करावे असे आव्हान शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिले वेदांता फॉक्सकॉनपेक्षा जास्त रोजगार रिफायनरी मधून मिळेल असा विश्वास ही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.
केसरकर सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी राजन पोकळे अशोक दळवी अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर माजी नगराध्यक्ष संजू परब भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे माजी नगरसेवक उदय नाईक दिपाली भालेकर परिमल नाईक, भारती मोरे, दिलीप भालेकर आदि उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, "वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून जनतेला भडकावण्याचे काम सुरू आहे.हे सत्तेसाठी राजकारण सुरू असून कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मराठी माणसांचा विचार झाला पाहिजे अन्यथा असं राजकारण महाराष्ट्रात जास्त दिवस चालणार नाही तरुण पिढी आता जागृत झाली आहे."
"मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आपल्या कार्यालयात एकदाही न गेलेलेच महाराष्ट्राच्या गल्लीबोळामध्ये फिरून जनतेला भडकावत आहेत. स्वतः सत्तेत असताना अडीच वर्षांमध्ये काय करू शकले नाही. परंतू दुसरे काय करत आहेत. त्यांनाही करू द्यायचं नाही ही त्यांची वृत्ती आहे."
"मुळात फॉक्सकॉनप्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया अडीच वर्षाच्या कार्यकाळात व्हायला हव्या होत्या पण काहीच केले नाही. आम्हाला तर आता फक्त दोन महिने झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडे असतात याची जाणीव त्यांनी ठेवावी एखाद्याला जास्तीच्या सोयी सुविधा कोणी दिल्या तर ते त्या राज्यात जातात आपण सुविधा द्याच्या नाहीत आणि कंपनीच्या प्रमुखांशी बोलायचे नाही आणि म्हणायचे प्रकल्प गेला. हा ठपका आमच्यावर कशासाठी?" असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला.
एक कंपनी दुसऱ्या राज्यात गेली म्हणजे जणू काय आकाश कोसळलं असंच रान विरोधक उठवत आहेत असा टोला ही विरोधकांना हाणला. कोकणामध्ये तीन लाख कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प मंजूर झाला आहे याला मात्र विरोध करतात ही दुटप्पी भूमिका बंद करा आणि सगळ्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन रिफायनरीचे समर्थन करा असे आवाहन ही केसरकर यांनी ठाकरे यांना दिले. यातून जास्त रोजगार निर्मिती होईल आणि कोकणचा कल्याण होईल असे केसरकर म्हणाले.