सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सव कालावधीत मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून येणाऱ्या व्यक्तींकडून जिल्ह्यात साथरोग पसरू नये म्हणून आरोग्य विभागामार्फत ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आरोग्य पथकांमार्फत विविध आजारांचे एक हजार १६७ रुग्ण आढळून आले आहेत. यात तापाचे ५१८, तर ३७ अतिसार रुग्णांचा समावेश आहे. गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे येथून लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असतात. या दरम्यान जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या साथरोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता आरोग्य विभागाने घेतली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या नेतृत्वाखाली १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानके, बसस्थानके व सार्वजनिक अशा एकूण १७ ठिकाणी वैयक्तिक पथके तैनात करण्यात आली होती. गणेशभक्तांचा वाढता ओघ पाहता स्थायी समितीच्या सूचनेनुसार १९ सप्टेंबरपर्यंत या पथकाला मुदतवाढ देण्यात आली होती. राज्यात लेप्टो व स्वाइन फ्लूची साथ असल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाणही जास्त आहे. साथरोग पसरू नये याची खबरदारी म्हणून जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानके, बसस्थानके व सार्वजनिक अशा एकूण १७ ठिकाणी वैयक्तिक पथके तैनात केली होती. यामध्ये १०२ आरोग्य कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत तैनात होते. हे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी रुग्णांची चौकशी करत. कोणी रुग्ण आढळल्यास तत्काळ औषधोपचार करत. या १७ वैद्यकीय पथकांमार्फत १,१६७ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यामध्ये ५१६ रुग्ण हे साध्या तापाचे, तर दोन रुग्ण हे स्वाइन फ्लू व डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले. या सर्वांचे रक्तनमुने घेऊन त्यांना औषधोपचार करून सोडण्यात आले. उलटी-जुलाबाचे ३७, हगवणीची लागण झालेले ८, तर सर्दी, खोकला, अंगदुखीचे ६०४ असे एकूण एक हजार १६७ रुग्ण आढळून आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गात विविध आजारांचे एक हजार १६७ रुग्ण
By admin | Published: September 20, 2015 9:46 PM