तळवडे : पूर्ण महाराष्ट्र राज्यात दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी व गुरुवारी थाटात साजरा झाला. जिल्हा व परजिल्ह्यातील हजारो भक्तगण श्री देवी माऊली चरणी नतमस्तक झाले.गुरूवारी सकाळपासूनच माऊलीच्या जयघोषात हजारो भक्तगणांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. योग्य नियोजन केल्यामुळे यावर्षी भक्तगणांना देवीचे सुलभ दर्शन घेता आले. माऊलीचा उत्सव लोटांगणाकरिता प्रसिद्ध आहे. उत्सव रात्री सव्वा अकरा वाजता सुरू झाला. लोटांगणाचा कार्यक्रम रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होता.
यावेळी प्रथम कुळघराकडून वाजत गाजत देवीची पालखी श्री देवी माऊली मंदिरकडे आली. त्यानंतर धार्मिक कार्यक्रम झाल्यावर प्रथम पुरुषांच्या लोटांगणास सुरूवात झाली. मंदिराच्या पायरीकडून लोटांगण सुरू झाले. पूर्ण मंदिराभोवती लोटांगण घातल्यानंतर मंदिराच्या दरवाजाच्या पायरीला हात लावल्यावर लोटांगणाची पूर्णता झाली.
पुरूषांपाठोपाठ महिलांनी उभ्याने हात जोडून लोटांगण घातले. हा लोटांगण सोहळा विलोभनीय होता. अवसरी देवाच्या सानिध्यात ढोल ताशांचा गजर सनई चौघड्यांच्या वाद्यात हा कार्यक्रम पार पडला. सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तांनी गर्दी केली होती. देवस्थान कमिटी, सोनुर्ली ग्रामस्थ मंडळ, माऊली भक्तगण मंडळ, पोलीस प्रशासन यांच्या योग्य नियोजन व सहकार्याने सोहळा पार पडला.तुळाभार कार्यक्रमालाही भाविकांनी केली गर्दीजत्रोत्सवाच्या गुरुवारी सकाळी तुळाभार कार्यक्रम पार पडला. या तुळाभार कार्यक्रमालाही अनेक भक्तगणांनी गर्दी केली होती. ज्या भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण होतात किंवा नवस पूर्ण होतात ते भक्तगण तुळाभार करतात. हा तुळाभार अन्नधान्य, वस्तू स्वरूपात असतो. धार्मिक रुढी परंपरेप्रमाणे हा कार्यक्रम झाला. गुरुवारी सकाळीही असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन नवसफेड केली.