कसई दोडामार्ग : पंचायत समितीच्या सभापतींच्या खुर्चीवर बसून काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी असभ्यतेचे वर्तन केले आहे व मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार भाजपाचे सभापती महेश गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात आली आहे. त्यानुसार एकनाथ नाडकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग पंचायत समिती भाजपाकडे आहे. सभापती म्हणून महेश गवस कार्यरत आहेत. असे असताना मंगळवारी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी पंचायत समितीच्या सभापतींच्या खुर्चीवर जाऊन बसले. तसेच असभ्य वर्तन केले व मारण्याची धमकी देत कामकाजात अडथळा आणला आहे, अशी तक्रार महेश गवस यांनी दिली. याबाबत एकनाथ नाडकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, पंचायत समिती सभापतींचे दालन खुले होते. मी पंचायत समितीला भेट दिली. त्यावेळी सभापतींच्या दालनात बसलो होतो. माझ्यासोबत गटविकास अधिकारी सिध्दार्थ आजवेलकर, अधिकारी व कार्यकर्ते होते. त्यामुळे अशा खोट्या तक्रारी करून महेश गवस हे आपली व्यक्तीगत मालमत्ता सिध्द करतात की काय, हे त्यांच्या पदाला योग्य नसून लाजिरवाणी गोष्ट आहे. तसेच महेश गवस हेही त्यावेळी उपस्थित होते. त्यांना आपली खुर्ची हवी होती, तर त्यांनी माझ्याकडे मागितली पाहिजे होती. मी देणार होतो. त्यामुळे पोलिसांनी तक्रार तपासूनच तक्रारी घ्याव्यात, असे नाडकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)
खूर्चीचा ताबा घेत जीवे मारण्याची धमकी
By admin | Published: March 02, 2016 11:05 PM