सिंधुदुर्गनगरी : बांदा येथील बळवंतनगर येथे राहणाऱ्या महिलेच्या घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवित ३ लाख ७२ हजार रुपयांच्या मुद्देमालाच्या जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. प्रदीप कळंबटे, सुनील उर्फ अल्ला लाडवे, संदीप प्रधान अशी आरोपींची नावे असून, त्यांना मुद्देमालासह शुक्रवारी चारकोप कांदिवली परिसरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांनी दिली.सावंतवाडी तालुक्यातील बांदा बळवंतनगर येथील श्रीमती नंदिनी नामदेव देसाई (वय ६५) या आपल्या बंगल्यामध्ये एकट्या असताना तीन अज्ञातांनी कुरिअर देण्याचा बहाणा करून बंगल्यात प्रवेश मिळविला व पिण्याचे पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी नंदिनी देसाई या घरात गेल्यावर त्यांना चाकूचा धाक दाखवित देसाई यांनी परिधान केलेल्या व कपाटातील असे एकूण ३ लाख ७२ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने जबरी चोरी करून तीन अज्ञातानी चोरून नेले होते. ही घटना १६ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली होती. याबाबतची तक्रार नंदिनी देसाई यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली होती.त्यांच्याकडून चार सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या पाटल्या, सोन्याचे चेन्स, दोन जोडी कानातील सोन्याच्या रिंगा, २ सोन्याच्या माळा, २ कानातील सोन्याचे डूल, २ कान चेन असा एकूण ३ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपींना कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, हवालदार सुधीर सावंत, गुरु कोयंडे, अनुप खंडे, अनिल धुरी, सत्यजीत पाटील या पथकाने केली. दरम्यान वरील तिन्हीही आरोपी चोरी करण्याच्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये बांदा परिसरात रहायला होते अशी माहिती विश्वजित कार्इंगडे यांनी दिली. विविध पथके स्थापनया प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोपविला होता. त्यानुसार या विभागाने वेगवेगळी पथके स्थापन करून बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी व गोवा अशा ठिकाणी पाठविली होती. मात्र गुन्ह्याचा तपास लागत नव्हता. (प्रतिनिधी)असा रचला सापळामुंबईतील एका खबऱ्याने चारकोप कांदिवली परिसरात अशाप्रकारे कुरिअरचा बहाणा करून लुटणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणचे एक पथक कांदिवली परिसरात पाठविण्यात आले होते. या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली. मात्र, यश आले नाही. खबऱ्यांच्या माहितीनुसार बावरेकर नगर चारकोपच्या झोपडपट्टीतून तिसऱ्या संशयितास ताब्यात घेऊन पोलिसी भाषा वापरल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व अन्य दोन साक्षीदारांची नावेही सांगितली. त्यानुसार प्रदीप शशिकांत कळंबटे (वय २८, कोपरी विरार पुणे), सुनील ऊर्फ अल्ला अमृत लाडवे (२७, चारकोप कांदिवली), संदीप बाबू प्रधान (२२, चारकोप कांदिवली) यांना शुक्रवारी या परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
बांदा घरफोडीतील तीन आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 12:09 AM