सिंधुदुर्गनगरी : पाणी घेण्याच्या बहाण्याने रात्री साडेआठ वाजता घरात घुसून तळेरे येथील दाम्पत्याला मारहाण करून सुमारे २ लाख ५ हजारांचा ऐवज चोरीप्रकरणी आरोपी विनायक कारबोटकर (वय २६), दीपक केरकर (३०, दोन्ही रा. गोवा) व प्रवीण पटेल (५०, मुधाळतिट्टा, भुदरगड) या तिघांना प्रत्येकी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी ठोठावली. कणकवली तालुक्यातील तळेरे औदुंबरनगर पेट्रोल पंपाजवळ दिलीप पाटील (६२) व त्यांची पत्नी मनीषा पाटील (५२) आपल्या घरात ८ एप्रिल २०११ रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान बसले होते. यावेळी त्यांना गेटकडे दोघेजण उभे असलेले दिसले. त्या दोघांनी आपली गाडी बंद पडली आहे, त्यामुळे रिकाम्या बाटलीत पाणी देण्याची विनंती केली. दिलीप पाटील यांनी घरात येऊन पत्नीला पाणी देण्यास सांगितले. त्यावेळी ते दोघेजण घरात आले होते. त्यातील एकाने दिलीप पाटील यांना धरून ठेवले, तर दुसऱ्या आरोपीने दिलीप पाटील यांच्या डोक्यावर लाकडी स्टम्पसारख्या दांड्याने मारले. यावरून मनीषा यांनी मारू नका, अशी याचना केली. त्याचदरम्यान, तिसरा आरोपी तेथे आला व पिस्तूल रोखून घेरले व दागिने व रोकड द्या, नाहीतर दोघांनाही संपवितो, असे धमकावले. त्यानंतर चौथा आरोपी आत आला. त्याने मनीषा यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानांतील कुडी काढून घेतल्या. त्यानंतर त्याने गाडीच्या चावीची मागणी केली. या आरोपींनी गोदरेज कपाटातील सोन्याचे दागिने, मुलाच्या बॅगेतील ३० हजार रुपये, मोबाईल व टाटा इंडिका गाडी असा सुमारे २ लाखांचा ऐवज घेऊन तेथून पलायन केले. याप्रकरणी मनीषा यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांनी तातडीने सूत्रे हलवून गुन्हा घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी आरोपी विनायक तुलशीदास कारबोटकर, प्रवीण बालाजी पटेल या दोघांना रेल्वे ट्रॅकवर पकडले. तर मायकल लुईस फर्नांडिस (३०, गोवा) व दीपक केरकर हे दोघेही स्कॉर्पिओ गाडी घेऊन गोव्याला पळून गेले होते. त्यांना गोव्यातून पकडून आणले व त्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले. यातील एक आरोपी मायकल लुईस फर्नांडिस याला गोव्यातील गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्याने व तो गोवा जेलमध्ये असल्याने सुनावणीस उपस्थित नव्हता. गोव्यातील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर फर्नांडिस याचा येथील न्यायालयात खटला सुरू राहणार आहे. सोमवारी झालेल्या खटल्याच्या सुनावणीत उर्वरीत तीन आरोपींना ३९४ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास, प्रत्येक ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास व कलम ३९७ अन्वये, ७ वर्षे असून कारावास व ५०६ (२) अन्वये २ वर्षे कारावास व ५०० रुपये दंड भरून, दंड न भरल्यास २ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. दरम्यान, या सुनावणीत दिलीप व मनिषा पाटील यांच्या साक्षीबरोबर तळेरेचे पोलीस पाटील अनंत काशीनाथ राणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
तीन आरोपींना सक्तमजुरी
By admin | Published: June 16, 2015 12:37 AM