चौके : मालवण तालुक्यातील धामापूर गावाला शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. धामापूर परबवाडी येथील शेतकरी शामसुंदर यशवंत परब यांच्या शेतमांगरावर वीज कोसळून तीन गुरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत शामसुंदर परब हेही जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता धामापूर परबवाडी येथील शेतकरी शामसुंदर यशवंत परब यांच्या शेतमांगरावर वीज पडून शेतमांगर पूर्णपणे जळून खाक झाला. त्याचप्रमाणे या शेतमांगरात बांधून ठेवलेले दोन बैल आणि एक गाय अशी तीन जनावरे जागच्या जागी जळून मृत्युमुखी पडली. या तीन गुरांसमवेत आणखी एक बैल बांधलेला होता, परंतु त्याने दावण तोडून पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, तोही गंभीररीत्या भाजला आहे. तसेच गुरांना वाचविण्याचा प्रयत्न करताना शामसुंदर परब यांनाही आगीच्या झळा लागून तेही जखमी झाले आहेत. या अग्निप्रलयामुळे शामसुंदर परब यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी धामापूरचे प्रभारी तलाठी इ. पी. गंगावणे, काळसे कोतवाल प्रसाद चव्हाण, सरपंच विजयकुमार धामापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीचा पंचनामा केला. अवघ्या काही दिवसांनी शेतीचा हंगाम सुरू होत असल्यामुळे अशाप्रकारे डोळ्यांसमोर बैल जळून खाक झाल्याने शामसुंदर परब यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जो बैल गंभीररीत्या भाजला आहे, त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी ए. एस. पराडकर उपचार करीत आहेत. (वार्ताहर)
वीज कोसळून तीन जनावरे मृत्युमुखी
By admin | Published: May 11, 2015 12:52 AM