सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतर लक्ष लागून राहिलेल्या पंचायत समिती सभापतिपदासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, सावंतवाडी आणि मालवण या तीन तालुक्यांची सभापतिपदे निर्विवाद काँग्रेसकडे राहिली आहेत. कुडाळ, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तीन ठिकाणी शिवसेना, तर देवगड आणि वैभववाडी या दोन ठिकाणी भाजपने बाजी मारली आहे. दोडामार्गमध्ये शिवसेनेने भाजपला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सभापतिपद मिळविले. तर राष्ट्रवादीला उपसभापतिपद देण्यात आले. त्यामुळे राज्यातील भाजपची घोडदौड रोखण्यासाठी आगामी काळात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आठ पंचायत समितींपैकी काँग्रेसने कणकवली, मालवण आणि सावंतवाडी या तीन ठिकाणी निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. कणकवलीत १६ पैकी १६, मालवणमध्ये १२ पैकी ९ आणि सावंतवाडीत १८ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचे सभापती विराजमान होणार हे स्पष्ट होते. कणकवलीत सभापतिपदी भाग्यलक्ष्मी साटम आणि उपसभापतिपदी दिलीप तळेकर, मालवणमध्ये सभापतिपदी मनीषा वराडकर आणि उपसभापती अशोक बागवे, तर सावंतवाडीत सभापतिपदी रवींद्र मडगावकर आणि उपसभापतिपदी निकिता सावंत यांची बिनविरोध निवड झाली. कुडाळमध्ये शिवसेनेने १७ पैकी १0 सदस्य निवडून आणत येथे भगवा फडकविला होता. त्यामुळे या ठिकाणी सभापतिपदी शिवसेनेचे राजन जाधव आणि उपसभापतिपदी श्रेया परब यांची बिनविरोध निवड झाली. देवगड पंचायत समितीच्या १४ जागांपैकी ६ जागा भाजपला, तर २ जागा शिवसेनेला आणि ६ जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होऊन भाजपचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती विराजमान झाले. यात सभापतिपदी जयश्री आडिवरेकर आणि उपसभापतिपदी संजय देवरूखकर यांची निवड झाली. वेंगुर्ले पंचायत समितीमध्ये १0 सदस्यांपैकी ५ सदस्य निवडून आणत शिवसेनेने सर्वाधिक जागा पटकाविल्या होत्या. या ठिकाणी उर्वरित ५ जागांमध्ये काँग्रेसला ४ आणि भाजपला एक जागा मिळाली होती. त्यामुळे येथे युती होऊन शिवसेनेचा सभापती म्हणून यशवंत परब, तर भाजपच्या उपसभापती म्हणून स्मिता दामले यांची निवड झाली. (प्रतिनिधी) दोडामार्गमध्ये सेनेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला हात दोडामार्गमध्ये पंचायत समितीच्या ६ जागांपैकी शिवसेनेला २, भाजपला २ आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये सभापती कोणाचा, यावरून मतभेद होते. त्यामुळे शिवसेनेने भाजपला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हाताशी धरत सभापतिपद मिळविले. तर राष्ट्रवादीला उपसभापतिपदाचा लाभ झाला. सभापतिपदी शिवसेनेचे गणपत नाईक, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुनंदा धर्णे यांची निवड झाली. वैभववाडीत सभापतिपदाची भाजपला लॉटरी वैभववाडी पंचायत समितीत ६ जागांपैकी काँग्रेसला ३ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला १ आणि भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे येथे युती आणि काँग्रेसच्या समसमान जागा असल्याने चिठ्ठी टाकून सभापतींची निवड झाली. यात भाजपला सभापतिपदाची संधी मिळाली. सभापतिपदी भाजपचे लक्ष्मण रावराणे, तर उपसभापतिपदी काँग्रेसच्या हर्षदा हरयाण यांची निवड झाली आहे. वैभववाडी तालुका स्थापनेनंतर प्रथमच वैभववाडी पंचायत समितीत ‘कमळ’ फुलले आहे.
काँग्रेस, सेनेकडे प्रत्येकी तीन सभापतिपदे
By admin | Published: March 14, 2017 11:14 PM