सिंधुदुर्गनगरी : ओरोस खर्येवाडी येथील ‘जीवन प्रकाश’ या निवासी संकुलातील तीन फ्लॅट बुधवारी भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडले. प्रदीप कदम हे राहत असलेल्या फ्लॅटमधील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र व दीड तोळ्याचा कोल्हापुरी हार असा मिळून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हे निवासी संकुल ओरोस पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व महामार्गापासून ६० मीटरच्या अंतरावर असूनसुद्धा चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडल्यामुळे खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील तेजस्वी तुषार काळसेकर या मुंबई येथे महिला अत्याचार निवारण समितीच्या बैठकीला गेल्याने त्यांचा फ्लॅट बंद होता. त्यांच्या बाजूलाच भाड्याने राहणारे बांधकाम ठेकेदार उदय अण्णा पाटील हे कामाच्या ठिकाणी गेल्याने त्यांचाही फ्लॅट बंद होता. त्यांच्या शेजारी सेवायोजन कार्यालयातील कर्मचारी प्रदीप कदम हे राहतात. ते आपल्या कार्यालयात गेले होते. त्यांची पत्नी शिक्षिका असल्याने त्याही शाळेत गेल्या होत्या. त्यांचा मुलगा प्रज्योत हा सकाळी ११ वाजता कामानिमित्त घराबाहेर गेला होता. त्यामुळे हे तीनही फ्लॅट बंद होते. हे निवासी संकुल तीन मजली असून, यामध्ये केवळ दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅट सुरूहोता, तर उर्वरित सर्व फ्लॅट बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी हे फ्लॅट दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास फोेडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. प्रज्योत हा सायंकाळी चार वाजता घरी परतला तेव्हा आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याने चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे लागलीच त्याने हा प्रकार शेजारी तसेच आई-वडील व पोलिसांना कळविला. ओरोस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मारुती जगताप व पोलिस उपनिरीक्षक संजय व्हटकर, संजय भोसले, पोलिस हवालदार विजय लोकरे, जोसेफ डिसोजा घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. पाठोपाठ स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे, आनंदराव काळे, संतोष निकम यांच्यासह ठसेतज्ज्ञ महेश पोटफोडे तसेच श्वानपथक दाखल झाले.
भरदिवसा तीन फ्लॅट फोडले
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM