सिंधुदुर्गनगरी : मालवण नगरपरिषद निवडणुकीत राष्टÑवादीचे राजेंद्र गावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी मालवणचे काँग्रेस नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यासह तिघांना मालवण न्यायालयाने दिलेली एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने अपिलात कायम केली आहे. आचरेकरांसह तिघांचीही सावंतवाडी येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गोट्या सावंत यांच्यावरील कारवाईनंतर कॉँग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे. ११ डिसेंबर २०११ रोजी मालवण नगरपरिषद निवडणुकीदरम्यान राष्टÑवादीचे राजेंद्र उपेंद्र गावकर (रा. मेढा, मालवण) हे मतदानादिवशी प्रभाग निरीक्षक म्हणून फिरत असताना त्यांना नगराध्यक्ष सुदेश सुबोध आचरेकर (वय ४७, रा. मेढा), संदीप शशिकांत मालंडकर (३५) आणि पांडुरंग ऊर्फ आबा ज्ञानदेव पराडकर (४८, दोघे रा. दांडी) या तिन्ही आरोपींनी गावकर यांना मारहाण केली होती. मालवण पोलीस स्थानकात गावकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार उपरोक्त तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. मालवण येथील न्यायालयाने तिघांनाही एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येक एक हजार रुपये दंड ठोठावला होता. याविरोधात आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. आज, मंगळवारी यावर सुनावणी होऊन मालवण न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी कायम केली. (प्रतिनिधी)
सुदेश आचरेकरांसह तिघांची शिक्षा कायम
By admin | Published: May 21, 2014 12:50 AM