सिंधुदुर्गनगरी, दि. ४ : ओखी चक्रीवादळाचा कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पोलिसांची गस्तीनौकाही या ओखी चक्रीवादळामुळे बुडाली आहे. दांडी येथे कुबल संघ यांची एक नौका व नारायण तोडणकर यांच्या दोन मच्छिमारी नौका सकाळी साडे आठच्या सुमारास बुडाल्या. यातील मच्छिमारी जाळ्याही वाहून गेल्या आहेत.
कोकणातल्या समुद्रांनी रविवारी रात्री रौद्ररुप धारण केलं. मालवण बंदरात उभी असलेली पोलिसांची सिंधू ५ ही गस्तीनौका समुद्राला आलेल्या उधाणामध्ये बुडाली आहे.लाटांच्या तडाख्याने बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान याच वेळी सिंधू २ या गस्तीनौकेतही पाणी शिरले होते. पण वेळीच पाणी उपसा केल्यानं सिंधू २ बोटीला वाचवण्यात यश आलं.मध्यरात्री बुडालेल्या सिंधू ५ नौकेला पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस बंदर जेटीवर दाखल झाले आहेत.समुद्राला उधाण, किनाऱ्याला मोठा तडाखासिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्याला मोठा तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचं पाणी वस्तीत घुसलं. किनाऱ्यावरील मच्छीमार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसला आहे. पिरावाडी गावाशी संपर्क तुटला आहे तर देवबागमध्ये कुलेर्वाडीत पाणी घुसलं आहे.
मालवण बंदरातील पोलिसांच्या बुडालेल्या सिंधू ५ स्पीड बोट गस्तीनौकेतील दोन कर्मचारी सुदैवाने बचावल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गस्ती नौका बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पोलीस यंत्रणा दुसऱ्या गस्ती नौकेला किनाऱ्यावर ओढून घेण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, किनाऱ्यावरील मच्छिमार बांधव व ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत. देवबाग मोंडकर वाडी येथील संजय मोंडकर यांच्या पर्यटक निवासातही समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसल्यामुळे तेथील चार पर्यटकांना मध्यरात्री अन्य हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान, आजही मोठ्या उधाणाची तसेच मोठ्या लाटांची शक्यता असल्याचे वर्तविण्यात आले आहे.
दरम्यान, दांडी येथे कुबल संघ यांची एक नौका व नारायण तोडणकर यांच्या दोन मच्छिमारी नौका सकाळी साडे आठच्या सुमारास बुडाल्या. यातील मच्छिमारी जाळ्याही वाहून गेल्या आहेत. विशाल सारंग आणि प्रथमेश गावकर हे दोघे या नौका वाचविण्यासाठी समुद्रात पोहत गेले. त्यांना एक नौका बाहेर काढण्यात यश आले. सकाळी एका पर्यटन नौकेचे इंजिन बंद पडल्याचीही घटना घडली. नौकेवरील इंजिन सुरू झाल्यानंतर ही नौका सर्जेकोट बंदरात रवाना झाली...