कणकवली : बिबट्याची हत्या करून त्याचे कातडे, नख्यांची तस्करी केल्याप्रकरणी श्रावण लक्ष्मण माणगावकर, श्रीराम सखाराम सावंत व मंगेश पांडुरंग सावंत यांची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. व्ही. हांडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली.४ ऑगस्ट २०२२ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेला माहितीवरून तळेरे येथे श्रावण माणगावकर चालवत असलेल्या बलेरो कारची तपासणी केली असता त्यात ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे सापडले होते. यावेळी आरोपी राजेंद्र पंढरीनाथ पारकर यालाही अटक करण्यात आली होती. तपासात भिरवंडे येथील आप्पा सावंत व मंगेश सावंत यांनी संबधित बिबट्याची कुंभवडे येथे हत्या करून त्याचे कातडे, नखे, हाडे जतन करून त्याबाबत कुंभवडे येथील संतोष मेस्त्री व श्रीराम सावंत या मध्यस्थांमार्फत श्रावण माणगांवकर याच्याकडून एक लाख रुपये घेतले.तसेच राजेंद्र पारकर याच्या मध्यस्थीने फणसगाव येथील समीर नारकर याला विकण्यासाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासात बंदुक, कोयते तसेच शिकारीचे अन्य साहित्य जप्त केले होते. आरोपी ११ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडीत होते. यापैकी श्रावण माणगावकर, श्रीराम सावंत व मंगेश सावंत यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असता प्रत्येक २५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर तसेच तपासात सहकार्य करावे , पोलीस ठाण्याला हजेरी लावावी व साक्षीदारांवर दबाव आणू नये. या अटींवर न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले .
बिबट्याची कातडे, नखे तस्करी प्रकरणातील तिघांची सशर्थ जामिनावर मुक्तता
By सुधीर राणे | Published: August 29, 2022 5:50 PM