दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी मुख्य राज्यमार्ग आंबेली कोनाळकरवाडी येथे बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कारला झालेल्या अपघातात साटेली येथील युवक गंभीर जखमी झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून हा अपघात झाला. यात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातात जखमी झालेला युवक आपल्या कारने दोडामार्ग ते साटेली-भेडशी असा प्रवास करीत होता. कारमध्ये तो एकटाच होता. दरम्यान आंबेली कोनाळकरवाडी येथे आला असता कारवरील त्याचा ताबा सुटला व कार थेट जाऊन झाडाला आदळली. त्याच्या मागून असलेल्या गाडीतील युवकांनी आपली गाडी थांबवली. ते दृश्य पाहिले खरे परंतु रस्त्याच्या बाहेर गेलेली अपघात ग्रस्त कार उचलून चालकाला बाहेर काढणे त्यांना शक्य नव्हते.
कार पूर्णतः कलांडली होती. एका काजूच्या झाडाला कारची पाठीमागची बाजू अडकल्याने कार पलटी झाली नाही. परंतु, कार मधील युवकाचे डोके व हात दरवाजातून बाहेर आले होते. त्याच्या नाकातून , कानातून व तोंडातून रक्तस्त्राव होत होता. घटनेबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांना ही बातमी समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस व जमलेल्या युवकांच्या साहायाने कार मधील जखमी युवकाला बाहेर काढून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात खासगी वाहनाने दाखल केले. येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला गोवा बांबूळी येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दोडामार्ग रुग्णालयातून देण्यात आली. हा युवक साटेली-भेडशी येथील आहे.घटनास्थळावरून बाबुराव धुरी यांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला परंतु रुग्णवाहिका वेळेत न पोचल्याने बाबुराव धुरी यांनी नाराजी व्यक्त केली.