कणकवली (सिंधुदुर्ग): कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात असलेल्या आर.बी.बेकरीसह एक मेडिकल स्टोअर आणि एका खासगी ऑफिसला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आज, शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कणकवली तसेच कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसी येथिल अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.पहाटे रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बेकरीच्या मागिल घरात राहत असलेल्या राजू, गौरव गवाणकर आगीची माहिती दिली. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, आग अधिकच भडकत गेली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच वीज प्रवाह खंडीत झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. आगीत आर. बी. बेकर्स या दुकानातील संपूर्ण फर्निचर, बेकरी माल जळून खाक झाला. तर बेकरीच्या मागील भागात असलेले राजू गवाणकर यांचे कार्यालय आणि कार्यालयालगत असलेल्या बर्डे यांच्या मेडिकल स्टोअर मधील साहित्याचेही नुकसान झाले. घटनास्थळी पोलिस, नगरपंचायत, महसूल प्रशासन दाखल झाले होते. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कणकवलीत बेकरीसह तीन दुकानांना आग; लाखोंचे नुकसान, ऐन दिवाळीत घडली दुर्दैवी घटना
By सुधीर राणे | Published: November 01, 2024 12:06 PM