सिंधुदुर्गनगरी : एका अल्पवयीन मुलीला मोबाईलमधून अश्लील फोटो दाखवून तिचा वर्षभर लैंगिक छळ केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील आरे बौद्धवाडी येथील प्रकाश धोंडू तळवडेकर (३४) याला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले आहे. जिल्हा विशेष न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी तीन वर्ष कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.प्रकाश तळवडेकर हा एका अल्पवयीन मुलीला मोबाईलमधून अश्लील फोटो दाखवायचा. तसेच तिच्यासोबत लैंगिक चाळे करत होता. विकृत प्रकार करून तिचा वर्षभर लैंगिक छळ करीत होता. याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या भीतीपोटी त्या अल्पवयीन मुलीने कोणालाही याबाबत कळू दिले नव्हते. एक दिवस घरात टीव्ही पाहत असताना त्या पीडित मुलीने आपल्या मावशीला याबाबत सर्व कथन केले. यानंतर घरातील सर्वांनी याबाबतची सत्यता पडताळून पहिली. त्यानंतर तिच्या आईने देवगड पोलीस ठाण्यात याबाबत १६ एप्रिल २०१५ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार देवगड पोलीस ठाण्यात प्रकाश तळवडेकर याच्या विरोधात बालकांचा लैगिक अत्याचार आणि इतर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता.प्रकाश तळवडेकर याला १६ एप्रिल २०१५ रोजी अटक केली होती. त्यानंतर २३ एप्रिल २०१५ पर्यंत त्याला पोलीस कोठडी व त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी झाली होती. तर १९ जून २०१५ पासून तो जामिनावर मुक्त होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली आहे. या प्रकरणी न्यायाधीश जगमलानी यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. आई, आते बहीण, आत्या, दोन पंच त्याचबरोबर वैद्यकीय प्रमाणपत्र देणारे डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास अधिकारी म्हणून तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी पाटे यांनी काम पाहिले होते. न्यायालयासमोर आलेले साक्षी-पुरावे तसेच वकील नाईक यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ यामध्ये प्रकाश याला निर्दोष ठरविले. तर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ नुसार तीन वर्ष कैद व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अधिक कैद, तर १२ नुसार दोन वर्ष कैद व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने अधिक कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी अभियोक्ता परिमल नाईक यांनी काम पाहिले.विकृत प्रवृत्तीला वचक बसेलपरिमल नाईकआपण न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी आहोत. अशा शिक्षा झाल्यामुळे विकृत प्रवृत्तींना वचक बसेल. अशाप्रकारे पीडित झालेल्या व्यक्तींनी समोर येऊन न्यायालयात दाद मागावी. असे मत या प्रकरणातील विशेष सरकारी वकील परिमल नाईक यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी त्यांनी तक्रारदार पक्षाचे अभिनंदन केले आहे.
लैंगिक छळप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:09 AM