मालवण : मत्स्य हंगामाची सुरुवात संघर्षाने होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांना मासेमारी करताना पर्ससीनधारकांकडून अर्वाच्य भाषेत धमकी देण्याचे प्रकार वाढले आहे.
आम्हाला पर्ससीन नेट लावायचा आहे, तुमची जाळी ओढून घ्या. नाहीतर जाळी तोडून टाकू अशी धमकीपूर्ण भाषा समुद्रात देण्यात आल्याने मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सुचनेनुसार या गंभीर प्रकाराची माहिती मच्छिमारांनी मत्स्य अधिकाऱ्यांना दिली आहे.बेकायदेशीरपणे कुणी पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करीत असेल तर त्यासंबंधीची माहिती मच्छिमारांनी मत्स्य विभागाला द्यावी, अशी सूचना मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी २६ जून रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार गुरुवारी पारंपरिक मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालयात जाऊन सिंधुदुर्गच्या समुद्र्रकिनाऱ्यावर अवैधरित्या सुरू असलेल्या पर्ससीन मासेमारीची माहिती दिली.
त्यामुळे नवा मत्स्य हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. परप्रांतीय नौकांना रोखण्याचे मोठे आव्हान मत्स्य विभागासमोर असणार आहे.पारंपारिक मच्छिमारांच्यावतीने माहिती देताना महेंद्र पराडकर म्हणाले, बेकायदेशीर पर्ससीन आणि एलईडी मासेमारीची माहिती पारंपरिक मच्छिमारांनी दिली तर मत्स्य विभागास कारवाई करणे सोपे जाईल असे २६ जून रोजी मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुनराव म्हणाले होते.
त्यानुसार आज बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांना दिली. राज्याच्या सागरी हद्दीत ३१ आॅगस्टपर्यंत पर्ससीन मासेमारीवर बंदी लागू आहे. असे असतानाही अवैधरित्या पर्ससीन मासेमारी केली जात आहे.पोलीस अधीक्षकांची भेट घेणारबेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीमुळे निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात पारंपरिक मच्छिमारांनी आमदार वैभव नाईक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शुक्रवार २३ आॅगस्ट रोजी ओरोस येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी पारंपरिक मच्छिमार आमदारांसमवेत पोलीस अधीक्षकांच्या भेटीस जाणार असल्याचे पराडकर यांनी सांगितले.