कसई दोडामार्ग : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तयार केलेले ‘रॉक गार्डन’ आगीत खाक झाले आहे. ते तिलारी धरणानजीक असून केवळ या गार्डनच्या देखरेखीसाठी कर्मचारी नसल्याने ते सुकून गेले होते. त्यातच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. याला पूर्णपणे तिलारी प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असल्याने याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या संंयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. हे धरण पूर्णपणे मातीचे असल्याने ते नयनरम्य दिसते. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळही काही कालावधीतच वाढली. मात्र, येथे लहान मुलांना वेळ घालविण्यासाठी सुंदर गार्डन असावे, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानुसार लाखो रुपये खर्च करून रॉक गार्डन मंजूर करण्यात आले. धरणाच्या बाजूला खाली रॉक गार्डन तयार करण्यात आले. गार्डनमध्ये सुशोभीकरणाची झाडे लावण्यात आली आणि गार्डन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, गार्डनमधील झाडांना मुबलक पाणीपुरवठा होत नव्हता. साफसफाई होत नव्हती. गार्डनमध्ये पूर्णपणे गवत वाढले होते आणि उन्हाळ्याच्या कडक उन्हात ती पूर्णपणे सुकून गेली होती. त्यामुळे आग लागताच काही वेळातच पूर्ण गार्डन जळून गेले. आगीचे कारण मात्र अद्यापपर्यंत समजलेले नाही. (वार्ताहर)खर्च कागदावर गेली पाच वर्षे रॉक गार्डन तयार केल्यानंतर तिची देखभाल, दुरुस्ती करण्यात आली नाही. गार्डनमधील झाडांना पाणी वेळेत मिळाले नाही. दुर्दैव म्हणजे धरणाच्या बाजूलाच असलेली ही गार्डन पाण्याअभावी सुकून गेली आहे. तिला जिवंतपणा नाही. गार्डनसाठी लाखो रुपये कागदावर खर्च करण्यात आले; पण प्रत्यक्षात किती खर्च झाले, हा संशोधनाचा विषय आहे. राजकीय पाठबळामुळे चौकशी नाहीतिलारी धरणाचे पाणी गोवा राज्यात जाते; पण धरणाच्या बाजूला असलेल्या गार्डनला मिळत नाही. म्हणजे येथे काहीतरी मुरते आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. रॉक गार्डनचे तीनतेरा वाजले, याला पूर्णपणे तिलारी कालवा विभाग जबाबदार आहे. मात्र, राजकीय पाठबळामुळे गार्डनची चौकशी झाली नाही.तिलारी धरणाच्या बाजूला असलेल्या रॉक गार्डनला आग लागून गार्डन पूर्णपणे जळाली आहे.
तिलारीचे ‘रॉक गार्डन’ आगीत खाक
By admin | Published: April 27, 2016 9:28 PM