सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड येथील चिरेखाणीजवळ झालेल्या अपघातात एका डंपरने बालिकेला धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना घडल्यानंतर बालिकेच्या आई वडिलांना हाताशी धरून संगनमताने प्रकरण दडपून तिचा मृतदेह चिरेखाणीतच दफन करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.दरम्यान, बुधवारपासून या प्रकरणाची चर्चा मळेवाड परिसरात सुरू होताच गुरुवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाची शहानिशा केली. त्यानंतर या प्रकरणात सत्यता आढळल्याने अपघात दडपणे, पुरावे नष्ट करणे, असे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.मळेवाड येथील एका चिरेखाण परिसरात ५ ऑगस्टच्या दरम्यान एक अपघात झाला. या अपघातात चिरेखाणीत काम करणाऱ्या दाम्पत्याची लहान मुलगी डंपरखाली सापडून जागीच मृत्युमुखी पडली. प्रकरण अंगलट येणार, या भीतीने चिरेखाणीत काम करणाऱ्या कामगारांसह चिरेखाण मालक, डंपर चालक आदींनी एकत्र येत मुलीच्या आई-वडिलांना हाताशी धरत हे प्रकरण दडपण्याचा निर्णय घेतला.चिरेखाण परिसरातच एक खड्डा मारून तेथेच त्या बालिकेच्या अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. त्यानंतर बालिकेच्या आई-वडिलांनाही त्याच्या मूळ गावी ओडिशा येथे पाठविण्यात आले होते. मात्र, कुठेही वाच्यता नसलेले हे प्रकरण गेल्या दोन दिवसांपासून मळेवाड परिसरात चर्चिले जात होते.
पोलिस तपासाला वेगपोलिसांनी या प्रकरणाबाबत काही जणांकडे चौकशी करून असा प्रकार घडला असल्याचे स्पष्ट होताच या बालिकेच्या आई-वडिलांना सावंतवाडीत येण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे बालिकेचे आई-वडील दोन दिवसांत सावंतवाडीत दाखल होणार आहेत. त्यानंतर या प्रकरणात दोषी कोण हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे
सर्व संशयितांवर गुन्हे दाखल करणार : अमोल चव्हाणसावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत आहोत. या कामी वापरण्यात आलेला मुद्देमालही हस्तगत केला जाणार आहे. त्या मुलीला दफन करण्यात जे जबाबदार आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात येईल.