गुहागर : अंजनवेल गावामध्ये ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करुनही कंपनी प्रशासनाने आर्थिक अडचणीचे कारण पुढे करत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारल्याने अखेर गुरुवारी कंपनी गेटसमोर अंजनवेलवासीयांतर्फे हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी दिली.रत्नागिरी गॅस प्रकल्पामुळे म्हणजेच पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पामुळे अंजनवेल गावातील विहिरी दुषित झाल्या आहेत. एकमेव ग्रामपंचायत नळपाणी योजनेच्या विहिरीतून पाणीसाठा होतो. एप्रिल - मे मध्ये हा पाणीसाठा पातळी खाली गेल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही. दरवर्षी रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने लेखी पत्र देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने दोनवेळा तहसीलदार वैशाली पाटील व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची आर्थिक स्थिती बिकट आहे, तसेच चिपळूण शिरळ येथून होणारा पाणीपुरवठाही कमी होत असल्याचे सांगत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नाकारले होते. यानंतर अंजनवेलवासियांनी ग्रामपंचायतीकडे दाद मागितल्यानंतर प्रकल्पासमोर हंडा मोर्चा काढण्याचे पत्र देण्यात आले. यावर तहसीलदार वैशाली पाटील यांनी प्रकल्पातील अधिकारी कौल यांच्याशी चर्चा करुन तोडा काढण्याचा प्रयत्न केला. पण याला यश आले नाही. अखेर अंजनवेलवासियांनी पाण्यासाठी प्रकल्प गेटसमोर गुरुवारी हंडा मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईची भीषणतायाबाबत अंजनवेल सरपंच यशवंत बाईत यांनी सांगितले की, चार ते पाच दिवसांनी नळपाणी योजनेतून अत्यल्प पाणीपुरवठा सध्या चालत असून एप्रिल महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने अखेर हंडा मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट केले. या गावाचा पाणीटंचाई आराखड्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जायचं कुठे? असा सवाल त्यांनी केला.
पाण्यासाठी आज हंडा मोर्चाचा निनाद
By admin | Published: April 01, 2015 10:49 PM