कणकवली : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या व वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अकराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘लोकमत’ सिंधुदुर्ग आवृत्तीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज, गुरुवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘स्थानिक स्वराज्य’ विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.गेल्या दहा वर्षांच्या काळात ‘लोकमत’ने सामाजिक बांधीलकी जपत सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आदी सर्वच विषयांवर सातत्याने विविधांगी लेखन, वृत्तलेखन केले आहे. विविध समस्यांबाबत त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित करून परिसंवादही यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. सार्वजनिक विभागातील कामकाजाचे स्टिंग आॅपरेशन करून तेथील अनास्थाही जनतेसमोर उघड केली आहे. विविध विषयांवरील पुरवण्यांसह जनतेच्या समस्या तितक्याच निर्भीडपणे ‘लोकमत’ने मांडल्या आहेत. शिवाय सामाजिक उपक्रमातही पुढाकार घेतला. त्यामुळे वाचकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण झाले आहे.वर्धापनदिनानिमित्त आज, गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कणकवलीतील नरडवे नाक्याशेजारी ‘लोकमत’च्या जिल्हा कार्यालयाच्या बाजूला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात ‘लोकमत’च्या ‘स्थानिक स्वराज्य’ विशेषांकाचे प्रकाशन येथील भालचंद्र महाराज मठात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने कार्यालयात सत्यनारायणाची महापूजा होणार आहे.स्नेहमेळाव्याला वाचक, वितरक, जाहिरातदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, सहायक शाखा व्यवस्थापक अतुल कामत, आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चा आज दहावा वर्धापनदिन
By admin | Published: March 29, 2017 11:36 PM