रत्नागिरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या व वाचकांच्या मनावर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा ‘दशकपूर्ती’ वर्धापनदिन आज, सोमवारी साजरा होत आहे. त्यानिमित्त कोकणात क्रांती घडवून आणणाऱ्या दळणवळण विषयांवरील ‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन सकाळी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. शहरातील आरोग्य मंदिराजवळील ‘लोकमत’ कार्यालयात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या भक्कम पाठबळावर दशकपूर्ती केलेल्या ‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकी जपत सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व राजकीय, आदी क्षेत्रातील सर्वच विषयांवर सातत्याने विविधांगी अभ्यासपूर्ण लेखन, वृत्तलेखन केले. विविध समस्यांचे कंगोरे उलगडवणारे तज्ज्ञांचे परिसंवाद आयोजित केले. विविध विषयांवरील पुरवण्यांसह जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्याही तितक्याच पोटतिडकीने आणि निर्भीडपणे ‘लोकमत’ने मांडल्या. सामाजिक उपक्रमांतही पुढाकार घेतला. यामुळेच वाचकांच्या मनात लोकमतने आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे.‘लोकमत’ दशकपूर्तीच्या या स्नेहमेळाव्याला अधिकाधिक वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)‘कोकणचा टर्निंग पॉर्इंट’लोकमत’ रत्नागिरी आवृत्तीच्या दशकपूर्ती विशेषांकामध्ये जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरणाऱ्या विविध दळणवळण सुविधांचा धांडोळा घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे १९९८ पासून धावू लागली आणि आज ती जिल्हावासीयांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. कोकण रेल्वेमार्गाचे आता दुपदरीकरण सुरू झाले आहे. डिझेलवर चालणाऱ्या कोकण रेल्वेची विद्युतीकरणाकडे झेप घेण्याची कार्यवाही सुरू आहे. चिपळूण-कऱ्हाड नवीन मार्ग मंजूर झाला आहे. जयगड-डिंगणी मालवाहतूक मार्ग होत आहे. अत्याधुनिक सुविधांचा कोकण रेल्वेमध्ये बहर आला आहे. कोकण रेल्वेचे विविध पैलू मांडणारे विषय या पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. जिल्ह्यात रस्ते वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहेच. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि व रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्ग रूंदीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. जिल्ह्याला जलवाहतूक व विमान वाहतुकीचे वेध लागले आहेत. या सर्व दळणवळण क्रांतीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला हातभार लागणार आहेच, शिवाय पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे.यासारख्या विविध विषयांचा विशेषांकात समावेश आहे.
रत्नागिरी ‘लोकमत’चा आज दशकपूर्ती वर्धापन दिन
By admin | Published: January 15, 2017 11:18 PM