मालवण : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी हंगामाची सांगता मंगळवार ३१ मे रोजी होणार आहे. गतवर्षी शासनाच्या नव्या धोरणानुसार संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसाच्या मासेमारी बंदी कालावधीला बुधवार १ जूनपासून सुरुवात होणार आहे. किनारपट्टीवरील मासेमारीच्या बहुतांश मोठ्या नौका किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी आणून ठेवल्या आहेत. तर उर्वरित नौकाही किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता १२१ किमी लांबीच्या किनारपट्टी लाभली आहे. यात मालवण, देवगड व वेंगुर्ले हे तीन तालुके थेट मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. गतवर्षी शासन निर्णय होण्याअगोदर महाराष्ट्रात १५ आॅगस्ट अथवा नारळी पौर्णिमा या कालावधीपर्यंत मासेमारी बंदी कायम असायची. मात्र महाराष्ट्राच्या लगत असलेल्या गोवा, कर्नाटक, केरळ व गुजरात या राज्यांचा मासेमारी बंदी कालावधी लवकर संपायचा. त्यामुळे बोटींची घुसखोरी होऊन महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील मासळीची लयलूट व्हायची. त्यामुळे शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, याबाबत मागणी करण्यात आली. त्यानुसार १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)आश्वासक सुरूवात : संघर्ष आणि दुष्काळाचा सामनागतवर्षी १ आॅगस्टपासूनच मासेमारीला सुरुवात झाली. सुरुवातीला मोरी, सुरमई, पापलेट या मोठ्या मासळीसह पारंपरिक मच्छिमारांच्या जाळीत तारलीही मिळाली. मात्र मत्स्य हंगामाच्या आश्वासक सुरुवातीनंतर मत्स्य उत्पादन घटले. अनधिकृत मासेमारी, परराज्यातील हायस्पीड मासेमारी ही आव्हाने झेलणाऱ्या मच्छिमारांना आचरा येथील संघर्षालाही सामोरे जावे लागले. त्यात पारंपरिक मच्छिमारांच्या दृष्टीने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घालताना नव्या परवान्यांना बंदी घालण्याचा दिलासादायक निर्णय राज्य शासनाने दिला. असे असले तरी मत्स्य दुष्काळाच्या झळा मत्स्य हंगामाच्या अखेरीपर्यंत कायम राहिल्या.बंदी कालावधी ९0 दिवसांचा असावा : तोरसकरगेल्या अनेक वषार्पासून देशभरात सर्वत्र एकाच वेळी मासेमारी बंदी कालावधी असावा यासाठी प्रयत्न सुरु होते. वेगवेगळ्या बंदी कालावधीमुळे मासेमारांची घुसखोरी होऊन बंदी क्षेत्रात मासेमारी व्हायची. मत्स्य बीज नाश होण्याबरोबरच मच्छिमारांत वादही निर्माण व्हायचे. मत्स्य प्रजननासाठी एक महिन्याची अधिक वाढ अपेक्षित आहे. हा कालावधी ९० दिवसाचा व्हावा यासाठी नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ व महाराष्ट्रातील मच्छिमार संघटना यापुढेही प्रयत्नशील आहेत, अशी माहिती भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.
मासेमारी हंगामाची आज सांगता
By admin | Published: May 30, 2016 10:58 PM