गुहागर : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत असून एकूण ४८ प्रभागातील ५० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. गावपातळीवरील राजकारणात बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. बुधवारी होणाऱ्या या मतदानासाठी निवडणूक प्रशासनासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. तालुक्यात अडूर, पडवे व वेळणेश्वर या तीन ग्रामपंचायतींची मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. गुहागर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी निवडणूक कर्मचारी त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये रवाना झाले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान होणार आहेत.गुहागर तालुक्यात एकूण २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील कोसबीवाडी, काजुर्ली, शिवणे, रानवी, भातगाव या ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित २१ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये अडुर, काताळे, उमराठ, कुडली, क ोंडकारूळ , जामसूत, शीर, गोळेवाडी, पेवे, मुंढर, तळवली, निगुंडळ, साखरीबुद्रुक, मासू, पालपेणे, खामशेत, पिंपर, वेळणेश्वर, नरवण, मळण, पडवे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील काही ग्रामपंचायतीचे काही प्रभाग बिनविरोध झाले आहेत. उर्वरित प्रभागात निवडणूक होणार आहे. यासाठी बुधवारी मतदान होणार असून यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या २१ ग्रामपंचायतींच्या ४८ प्रभागामधील एकूण ५० मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून यासाठी निवडणूक प्रशासनाकडून एकूण ५० प्रिसायडींग आॅफीसर नेमण्यात आले आहेत.त्याचप्रमाणे मतदान अधिकारी नंबर १, मतदान अधिकारी नंबर २ व मतदान अधिकारी नंबर ३ यांची प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक अशी नेमणूक करण्यात आली आहे.तसेच प्रत्येक मतदान केंद्रासाठी १ पोलीस कर्मचारी व एक शिपाई असणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा मुख्यालयाकडून दोन पोलीस अधिकारी व ३६ पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच गुहागर पोलीस स्थानकातील दोन अधिकारी, २० पोलीस कर्मचारी, १४ होमगार्ड याप्रमाणे ४ अधिकारी, ५६ कर्मचारी व १४ होमगार्ड असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (वार्ताहर)
राजकीय चढाओढीत आज सत्त्वपरीक्षा
By admin | Published: April 21, 2015 10:37 PM