सुधीर राणे
कणकवली: सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत ओसरगाव टोलनाक्यावर गणेशोत्सव कालावधीत सफेद नंबर प्लेट असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिगर व्यावसायिक एम एच ०७ पासिंगच्या वाहनांना टोल माफी देण्यात आल्याची माहिती आमदार नितेश राणे यांना महामार्ग टोल वसुली ठेकेदार कंपनी एम.डी. करीमुन्नीसा यांनी दिली आहे. कंपनीने याबाबतचे पत्र आमदार राणे यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर ही टोल माफी देत आहोत.दरम्यान, वाहनचालक, लोकप्रतिनिधी यांची मागणी मान्य झाल्याबाबतचे संबधित पत्र नीतेश राणे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सादर केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल माफी देण्यासंदर्भात आमदार राणे यांच्यासोबत महामार्ग टोल ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची यापूर्वी चर्चा देखील झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेनुसार स्थानिकांना ओसरगाव टोल नाक्यावर नोकरी देण्यात आल्याचेही या पत्राद्वारे ठेकेदार कंपनीने कळविले आहे. महामार्ग चौपदरीकरणाची अपूर्ण कामे, मोबदला वितरण तसेच भूसंपादन, भरपाई व टोल नाक्यावर स्वच्छतागृहांची व्यवस्था याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे समन्वयक यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आवाहन देखील टोल ठेकेदार कंपनीने आमदार राणे यांना या पत्राद्वारे केले आहे.