सावंतवाडी : मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हाल झाले आहेत.मात्र, याकडे साधे लक्ष देण्यासही प्रशासनाला वेळ नाही. मोठा पाऊस लागला की सतत येथील कुटुंबांचा जीवन मरणाचा प्रश्न असतो. मात्र, येथील ग्रामस्थांची ना प्रशासनाला काळजी ना लोकप्रतिनिधींना. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? असे ही कुटुंबे विचारीत आहेत.चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ग्रामस्थ शरद मोहन नाईक यांनी तेथील लोकांची व्यथा मांडली. ते ऐकून मन हेलावून गेले खरे, पण याकडे आता लक्ष कोण देणार? या कुटुंबांना न्याय कोण देणार हा खरा प्रश्न आहे. मुसळधार पावसात घरातून पाण्याचे झरे वाहतात. त्यामुळे घराबाहेर आसरा नाही व घरातही राहता येत नाही अशी परिस्थिती तेथील ग्रामस्थांची झाली आहे.याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी चिखलवाडी बेरडकी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची शरद नाईक व इतर ग्रामस्थांनी भेट घेऊन आपली कैफियत मांडली.सुमारे पाच फूट पाण्यातून आपल्याला रस्ता पार करावा लागला. दोन्ही बाजूने पाण्याचा वेढा असल्याने लहान मुले, वृद्ध घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. घरातूनही पाणी वाहत आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत, अशी कैफियत त्यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासमोर मांडली.सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे लक्ष वेधून चौकुळ बेरडकी चिखलवाडी येथील ग्रामस्थांबाबत तातडीने उपाययोजना करून त्यांचे जीवन सुरक्षित करावे, अशी मागणी केली आहे.
चौकुळ बेरडकी परिसर हा मोठा असला तरी या ग्रामस्थांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही असेच यातून दिसून येते. सुमारे ३५ ते ४० घरांमध्ये पावसामुळे पाणी येत असते. त्यामुळे अनेकांचा वर्षानुवर्षे केलेला संसार या पाण्यात वाहून जातो. याची नुकसान भरपाईही त्यांना दिली जात नाही. त्यामुळे यावर मार्ग काढणे आवश्यक आहे.