कणकवली: कणकवली नगरपंचायतच्या माजी पदाधिकाऱ्यांच्यावतीने ११ ते १४ जानेवारी या कालावधीत 'कणकवली पर्यटन महोत्सव २०२४' चे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने फूड फेस्टिव्हल तसेच विविध कार्यक्रमांची महापर्वणीच रसिकांना लाभणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संजय कामतेकर, अभिजित मुसळे, मेघा गांगण, अजय गांगण आदी उपस्थित होते.नलावडे म्हणाले, सध्या नगरपंचायतमध्ये प्रशासक असल्याने नगरपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव आयोजित केलेला नाही. पण स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवकानी दरवर्षीप्रमाणेच पर्यटन महोत्सव घेण्याचे ठरविले. त्याअंतर्गत ११ जानेवारी रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 'बेधुंद ऑर्केस्ट्रा' होईल. महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी १२ जानेवारी रोजी २०० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जानेवारीला शेवटच्या दिवशी हिंदी चित्रपट सृष्टीतील 'सेलिब्रेटी' कलाकार व ख्यातनाम गायक कणकवलीत हजेरी लावणार आहेत.
कणकवलीत ११ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव; रसिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
By सुधीर राणे | Published: December 11, 2023 2:02 PM