सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २९ ते ३१ जानेवारी दरम्यान मालवण बोर्डींग मैदानावर आयोजित केला असून या माध्यमातून पर्यटन धोरण मुख्यमंत्र्यांसमोर सादर केले जाणार आहे. यामुळे पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे पर्यटन निर्णय घेतले जातील, असा विश्वास जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी व्यक्त केला. तसेच गोवा, राजस्थान, केरळ या पर्यटन समृद्ध राज्यांच्या पर्यटन धोरणांचा या निमित्ताने अभ्यास करून त्याचा अवलंबही पर्यटनवाढीच्या दृष्टीने केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव कार्यक्रम आयोजनाची पत्रकार परिषद शुक्रवारी येथील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, पर्यटन महामंडळाचे प्रकल्प अधिकारी दीपक माने आणि प्रभारी माहिती अधिकारी संध्या गरवारे उपस्थित होत्या.पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येणार आहेत. म्हणूनच पर्यटनदृष्ट्या येथील स्थानिकांना रोजगार मिळावा, येथील लोककलांना वाव मिळावा व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन धोरणासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय यावेळी होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने सिंधु पर्यटन कॉफी टेबल बुक, पर्यटन बेवसाईट, फोटोग्राफी, वाळूशिल्प, नौकानयन लोगो व घोषवाक्य, उत्कृष्ट पर्यटन संस्था आदींना गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने मालवणमधील विविध हॉटेल्स व लॉजिंग व्यावसायिकांना या पर्यटन महोत्सव कालावधीत पर्यटकांना सूट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पर्यटकांची वाहतूक व्यवस्था करणाऱ्या वाहन चालकांकडून अवास्तव भाडे आकारणी केली जाणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येणार आहे. पर्यटनाच्या विकासामुळे घनकचरा साचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. या घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे करता येईल व त्यासाठी भारतात कुठे कुठे कोणते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, याची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. मालवण हा समुद्र किनाऱ्यालगतचा तालुका असल्यामुळे सीआरझेडची अडचण अनेक पर्यटन प्रकल्पांना होत आहे. त्यातून मार्ग कसा काढावा याबाबतही शासनाकडून यानिमित्ताने मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने ३० व ३१ या दोन दिवसांसाठी १०० पर्यटकांना मोफत पॅकेज टूरचे आयोजन करण्यात आले आहे. या १०० पर्यटकांची निवड झालेल्या प्रवेशिकांमधून लकी ड्रॉ काढून करण्यात येणार आहे. या पर्यटन महोत्सवासाठी पर्यटन महामंडळाकडून ४० लाख रूपये, नियोजन समितीकडून ३० लाख, जागतिक विकास निधीकडून १० लाख असून ८० लाखाचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन महोत्सवासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, पालकमंत्री, राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. (प्रतिनिधी)तालुकास्तरावरही पर्यटन महोत्सवतालुकास्तरीय पर्यटन महोत्सव २४ ते २६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यांमध्ये २४ जानेवारीला, कुडाळ व मालवण तालुक्यात २५ जानेवारीला तर सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग तालुक्यात २६ जानेवारीला कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. यावेळी शोभायात्रा व स्थानिक लोककलांचे कार्यक्रम घेतले जातील. या कार्यक्रमांमधून मिळणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या लोककला कार्यक्रमांना जिल्हास्तरीय पर्यटन महोत्सवात आपली कला सादर करता येणार आहे.पर्यटन महोत्सवासाठी राजस्थान, केरळ, गोवा राज्यातील टूर आयोजकांना टूर पॅकेज आयोजित करून सिंधुदुर्गातील विविध पर्यटनस्थळांची सैर घडवून आणण्याचे आवाहन केले. यासाठी गोव्यातही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यावेळी बॅकवॉटर पर्यटन, साहसी पर्यटन, सागरी पर्यटन यामध्ये त्या राज्यांनी कशाप्रकारे विकास केला, याचा आढावा घेण्यात येणार आहे.- ई रवींद्रन, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
पर्यटन धोरण सादर करणार
By admin | Published: January 16, 2015 9:25 PM