कपिल गुरव -आचरा यावर्षीच्या पर्यटन हंगामाला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. कोल्हापूर, पुणे, मुंबईचे पर्यटक मोठ्या संख्येने मालवण, तारकर्ली, देवबाग आदी पर्यटनस्थळांकडे धाव घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर थोड्या आडबाजूला असलेल्या परंतु निसर्गसौंदर्याने रमणीय अशा आचरा, तोंडवळी, तळाशिल, वायंगणी या मालवणपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पर्यटनस्थळांमध्येही स्थिरावू लागले आहेत. परंतु याठिकाणी पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या प्रसाधनगृह, समुद्रस्नानानंतर चेंजिंग रुम अशा मुलभूत सुविधांची वानवा भासत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा शासनाने पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केल्यानंतर मालवणचा तारकर्ली पॅटर्न जगभर प्रसिद्ध झाला. यामुळे जगभरातून तारकर्लीकडे पर्यटकांचा लोंढा वाढू लागला आहे. पर्यटनाच्या हंगामात तारकर्ली, मालवणमधील लॉजेस, हॉटेल, रिसॉर्ट हाऊसफुल्ल होऊ लागल्याने तारकर्लीनजीकच्या आचरा, तोंडवळी, तळाशिल, वायंगणी या पर्यटनस्थळांकडेदेखील पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. आचरा, तोंडवळी, तळाशिल परिसरातदेखील अनेकजणांनी रिसॉर्ट, हॉटेल सुरु केले आहेत. दिवसेंदिवस येथील रमणीय समुद्रकिनारी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु याठिकाणी पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, मुलभूत सेवा सुविधांची वानवा असल्याने याठिकाणी येणारा पर्यटक थोडा नाराज होत आहे.प्रशासनाचे दुर्लक्ष : सुविधांसाठी पाठपुरावा हवाआचरा ते तळाशिल हा सलग १२ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारी सलग सुंदरतेने बहरलेला असून तोंडवळी येथील विस्तीर्ण सुरुबन, कालावल खाडी अशी निसर्गसौंदर्याने बहरलेली रमणीय ठिकाणे तारकर्ली-मालवणच्या खालोखाल पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. स्थानिकांनीदेखील आगामी काळात वाढणाऱ्या या पर्यटकांच्या संख्येकडे लक्ष देताना स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत व वैयक्तिकरित्या साध्या साध्या झावळ्यांच्या चेंजिंग रुमची बांधणी करणे गरजेचे असून शासन पातळीवरदेखील पाठपुरावा करून अद्ययावत स्वरूपाच्या चेंजिंग रुम, प्रसाधनगृह बैठकीच्या व्यवसायांची सोय करणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून प्रशासनाने दुर्लक्ष केले असले तरी येथील पर्यटन व्यावसायिकांना आणि स्थानिकांनीही या सुविधांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करायला हवा.
आचऱ्यात पर्यटन हंगाम सुरू
By admin | Published: October 09, 2015 11:01 PM