कणकवली : कणकवलीपर्यटन महोत्सव २०२० चे आयोजन २ ते ५ जानेवारी २०२० च्या दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तर याचा समारोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या पाच दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मनोरंजनासाठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार कणकवलीत दाखल होणार असल्याने हा महोत्सव रंगतदार होणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, अभिजित मुसळे, अबिद नाईक, मेघा गांगण, संजय कामतेकर, अण्णा कोदे, संदीप नलावडे, पंकज पेडणेकर आदी उपस्थित होते.यावेळी समीर नलावडे म्हणाले, या महोत्सवात मनोरंजनासोबत खवय्यांसाठी मुंबई, गोवा, कर्नाटक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत हॉटेल्सचे स्टॉल असलेला फूड फेस्टिवल असणार आहे. याचा शुभारंभ २ जानेवारी रोजी सायंकाळी ६. ३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत व मुख्याधिकारी अतुल पिंपळे उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ७ वाजता मुख्य रंगमंचाचे उदघाटन विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर आदी उपस्थित राहणार आहेत.या सोबत ग्रुपडान्स स्पर्धा, २०० स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेला सुवर्ण तडका, किड्स फॅशन शो, बेधुंद म्यूजिकल नाईट आदी कार्यक्रम होणार आहेत.आदर्श शिंदे लाईव्हचे विशेष आकर्षण !या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची अदाकारी पाहण्याची संधी सिंधुदुर्ग वासियांना मिळणार आहे. २ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता 'जल्लोष धमाल कॉमेडी शो ' आयोजित करण्यात आला आहे. यात 'चला हवा येऊ द्या फेम ' विनोदाचे बादशाह भाऊ कदम आणि कुशल बद्रिके , प्रसिद्ध गायक कविता राम, अभिजित कोसंबी, अक्षता सावंत आदी कलाकार असणार आहेत.तसेच शनिवार ४ जानेवारी रोजी बेधूंद म्यूजिकल नाईट मध्ये कॉमेडी एक्सप्रेस फेम समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार, गायक राहुल सक्सेना, जुईली जोगळेकर, आनंदी जोशी यांसह जिल्ह्याचे सुपुत्र दिगंबर नाईक उपस्थित राहणार आहेत.
आपल्या सुमधुर आवाजाने अनेकांना घायाळ करणारे प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या हिंदी मराठी गाण्याची मैफिल 'आदर्श शिंदे लाईव्ह' या सुमारे साडे तीन तासाच्या कार्यक्रमात जिल्हावासीयांना ऐकायला मिळणार आहे. या महोत्सवाला सर्व जिल्हावासियांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी केले.