महादेव भिसे - आंबोली -आंबोलीतील पर्यटन प्रामुख्याने तीन हंगामात चालते. उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. सध्या आंबोलीच्या गुलाबी थंडीत पर्यटक चांगलेच स्थिरावले असून, पर्यटन हंगाम जोमात सुरू आहे. पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, गुजरात या ठिकाणचेही पर्यटक यंदा आंबोलीत मोठ्या प्रमाणात आले आहेत. गोव्याला जायचे, तर आंबोली मार्गेच, असे काहीसे वेळापत्रक बनवूनच पर्यटक बाहेर पडत असावेत. पावसाळ्याच्या तुलनेने सध्या आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जरी कमी झाली, तरी हे पर्यटक कुटुंबवत्सल असल्यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाला चांगलाच व्यवसाय देतात, असे येथील पर्यटन व्यावसायिक सांगतात. पावसाळ्यातील पर्यटकांचा उपद्रव पाहता, उन्हाळी आणि हिवाळी पर्यटन हंगामातील पर्यटकांचे स्वागत येथील व्यावसायिक आनंदाने करतात. कारण या दोन्ही पर्यटन हंगामात येणारे पर्यटक पावसाळ्यात येणाऱ्या पर्यटकांप्रमाणे केवळ एक दिवसाची सहल करीत नाहीत. हिवाळ्यात व उन्हाळ्यात येणारे पर्यटक आंबोलीत तब्बल दोन ते तीन दिवस राहणे पसंत करतात. त्यामुळे आपसुकच इथल्या व्यावसायिकांना चांगला पर्यटन व्यवसाय मिळतो. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्या पावसाळी पर्यटकांपेक्षा या पर्यटकांकडे सध्या येथील व्यावसायिक लक्ष केंद्रीत करीत आहेत. आंबोलीत गेल्या पाच वर्षात पावसाळा वगळता पर्यटकांची संख्या थोड्याफार प्रमाणात घटली आहे. यात प्रामुख्याने घाटात दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे पर्यटक आंबोलीत येण्यास घाबरताना दिसत आहेत. याशिवाय मुलभूत सुविधा, ज्यात चेंजींग रुम, टॉयलेट, बाथरुम यासारख्या सुविधा नसल्यामुळेही थोडीफार गैरसोय होत आहे. याबाबत स्थानिकांनी वारंवार लक्ष वेधूनही अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. आंबोलीत पाहण्याजोगी पाच ते सहा पर्यटन स्थळे आहेत. यात हिरण्यकेशी नदीचा उगम, राघवेश्वर स्वयंभू गणपती, महादेवगड पॉर्इंट, कावळेशेत पॉर्इंट, नांगरतास धबधबा, मुख्य धबधबा, शिरगावकर पॉर्इंट यासारख्या नयनरम्य पर्यटनस्थळांचा समावेश आहे. ग्रामीण कृषी, निसर्ग पर्यटनाला प्रतिसादआंबोली, चौकुळ व गेळे या तिन्ही गावांमध्ये सध्या सुरू असलेल्या ग्रामीण कृषी व निसर्ग पर्यटनाला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. हंगामातील पर्यटकांंची संख्या एका बाजूला, तर उरलेल्या साठ महिन्यातील पर्यटकांची संख्या एका बाजूला असते.गावरान भोजन, नदीत डुंबणे, गुहा, सडे भ्रमंती, पक्षी निरीक्षण, जंगल सफारी, वनस्पती, फुलपाखरू, साप, बेडूक निरीक्षण यासारखे नवनवीन उपक्रम यात राबविले जात आहेत.
गुलाबी थंडीत पर्यटक स्थिरावले
By admin | Published: January 14, 2015 10:01 PM