दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग) : पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटून रणरणत्या उन्हात तिलारी घाटातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांच्या कारला घाटात अचानक आग लागल्याची घटना रविवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यापूर्वीच कार जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पर्यटकांचे काही सामान जळाले. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी बर्निंग कारचा थरार जवळून अनुभवला.आंध्र प्रदेश येथील पाच पर्यटक पर्यटनासाठी होंडा सिटी गाडीने गोव्याला आले होते. पर्यटनाचा आनंद लुटून रविवारी दुपारच्या सुमारास ते तिलारी घाटाच्या मार्गे परतीच्या प्रवासाला निघाले. तिलारी घाट चढत असताना घाटाच्या उत्तरार्धात त्यांची गाडी पोहोचली असता चालकास कारच्या समोरील बाजूवरून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ प्रसंगावधान राखत कारचा वेग कमी केला. मात्र, वेळ फारच कमी असल्याने त्याने हॅण्ड ब्रेक लावून गाडी रस्त्यातच उभी केली व कारमधील पाचही जण खाली उतरले. त्यांनी कारमधील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, कारला आग लागून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यामुळे भयभीत झालेल्या पर्यटकांचे काही सामान कारमध्येच उरले.
दुपारच्या रणरणत्या उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे आग वाढत गेली. कारने पेट घेतल्याचे दिसताच या घटनेची माहिती चंदगड पोलिस आणि अग्निशमन दलाला कळविण्यात आली. चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरक्षित राहील याची दक्षता घेतली. काही वेळात चंदगड नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण कारला आगीच्या ज्वाळांनी वेढा घातला होता. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यादरम्यान घाटात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.