दोडामार्ग : मांगेली येथे वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटून सायंकाळी घरी परतणाऱ्या बेळगाव येथील पर्यटकांच्या चमूवर मधमाशांनी हल्ला केला. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बेळगाव येथील केएलइ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी उशिरा मांगेली व कर्नाटक सीमेवरील सडा खिंड येथे घडली. रमेश दोड्डामणी ( २५) व संजय बेळकुंदरीकर ( २६) अशी गंभीर जखमींची नावे असून, इतरही चारजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.सध्या दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. साहजिकच सह्याद्रीच्या डोंगरांगांधील धबधबे प्रवाहित झाले आहेत. मांगेली फणसवाडीचा धबधबाही पूर्णक्षमतेने कोसळत आहे. त्यामुळे या धबधब्याच्या पांढऱ्या शुभ्र पाण्याखाली न्हाऊन निघण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गोवा, कर्नाटक राज्यातील पर्यटक तुफान गर्दी करीत आहेत.रविवारी मांगेलीच्या वर्षापर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मांगेलीत दाखल झाले होते. शेजारील कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या सात तरुणांचा एक ग्रुप मांगेलीत आला होता. दिवसभर मजा मस्ती करून वर्षापर्यटनाचा आस्वाद लुटल्यावर ते सडामार्गे चोरल्याच्या रस्त्याने घरी जाण्यास निघाले. मांगेलीची सीमा जिथे संपते व कर्नाटक सीमा सुरू होते अशा सडा खिंड म्हणून परिचित असलेल्या जागेवर ते थांबले व त्यातील दोघेजण लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले. त्यापैकी एकाने खिंडीवरून खाली सहजच दगड मारला. तो मधमाशांच्या पोळ्यावर जाऊन बसला आणि त्या डिवचल्या गेल्या. परिणामी डिवचलेल्या मधमाशांनी त्या युवकांवर काही कळायच्या आतच हल्ला चढविला. यावेळी त्यांच्या गाडीत प्लास्टिक होते त्या प्लास्टिकच्या आधारे गाडीतील इतर सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना गाडीत घालून उपचारासाठी थेट बेळगावच्या केलइ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून समजते.
सिंधुदुर्गातील मांगेलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 1:22 PM