कसई दोडामार्ग : कसई-दोडामार्ग आणि वाभवे-वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण मुंबई मंत्रालयात ९ नोव्हेंबरला सोडत पद्धतीने टाकले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर सेना भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत भाजपा ५, शिवसेना ५, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे १ असे उमेदवार निवडून आले. मात्र, नगराध्यक्ष पदाचे आरक्षण टाकले गेले नसल्याने या नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदी कोण विराजमान होते, हे निश्चित झाले नसल्याने या निवडणुकीनंतर युती, आघाडी, या चार पक्षांमध्ये अगदी शांतता पसरली होती. गेले चार-पाच दिवस युती आणि आघाडीच्या सदस्यांचे अंतर्गत गाठीभेठीही घडल्याची चर्चा सुरू होती. मात्र, चर्चेला शुक्रवारी दोडामार्गात युतीच्या उमेदवारांनी गट निर्माण केल्याने चर्चा व गाठीभेटींना पूर्णविराम मिळाला.सोमवार ९ नोव्हेंबरला नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत पद्धतीने मुंबई मंत्रालयात टाकले जाणार असल्याने युती आणि आघाडी तसेच मनसेमध्ये पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सर्वसाधारणमधून पडले, तर भाजपा आणि मनसे आपला दावा करू शकतात. तर मनसे आणि काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याकडेही लोकांचे लक्ष वेधून राहणार आहे. सर्वसाधारण महिलांमधून आरक्षण पडले तर भाजपा शिवसेनेबरोबर, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, याहीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. ना. मा. प्रवर्ग महिलामधून आरक्षण पडले तर शिवसेना आणि भाजपा आपला दावा करतील. तर काँग्रेसकडे एक सदस्य असल्याने काँग्रेस कोणती राजकीय खेळी खेळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (वार्ताहर)... तर वैभववाडीत नगराध्यक्षपदाची लॉटरीवैभववाडीमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी अपक्ष व ग्रामविकास आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याची मदत घेऊन बहुमत मिळविले आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी पडले तर काँग्रेसच्या गटात या आरक्षणाचा उमेदवार नसल्याने ते पद रिक्तच राहण्याची शक्यता आहे. तर वैभववाडी नगरविकास आघाडीकडे या प्रवर्गाचे महिला आणि पुरूष दोन्ही उमेदवार असल्याने आरक्षण पडल्यास नगराध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते.
नगराध्यक्ष आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत
By admin | Published: November 07, 2015 10:10 PM