रजनीकांत कदमकुडाळ : कुडाळ शहरातील विजेचे विविध प्रश्न तसेच शहरात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा याबाबत कुडाळ शहरातील व्यापारी व सुजाण नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी कुडाळ-एमआयडीसी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शहरातील विविध समस्यांबाबत महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला. नागरिकांनी महावितरण विभागाच्या बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला.यावेळी वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष व व्यापारी संघटना कुडाळ तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय भोगटे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रसाद रेगे, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सृती वर्दम, सुनील भोगटे, राजन नाईक, द्वारकानाथ घुर्ये, निकू म्हाडेश्वर, लालू पटेल, सागर तेली, द्वारकानाथ घुर्ये, रत्नाकर जोशी, सतीश वर्दम, सुशील चिंदरकर, सचिन काळप, राजू गवंडे आदी व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
महावितरणच्या निष्क्रिय व बेजबाबदार कामकाजामुळे शहरातील ग्राहकांना नाहक मानसिक व आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नुसती आश्वासने दिली. शहरातील समस्या ‘जैसे थे’च आहेत.वीज महावितरणकडून ग्राहकांना चांगल्या सेवा दिल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला. शहरातील वीज वारंवार जात असते. परंतु, एमआयडीसीमधील वीज चोवीस तास कशी सुरू असते, असा सवाल संजय भोगटे यांनी केला. आता जीर्ण झालेले वीज खांब बदलण्याचा प्रस्ताव दिला आहात का, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर अधीक्षक अभियंता पाटील प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले.
वीज कर्मचारी ग्राहकांना उद्धट उत्तरे देतातशुक्रवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज गेल्यावर संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. जर फोन उचलला तर तुमचे कर्मचारी ग्राहकांना उद्धट भाषेत उत्तरे देतात. त्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या, ग्राहकांना चांगल्या भाषेतच उत्तरे दिली पाहिजेत, असे सुनील भोगटे व अभय शिरसाट यांनी पाटील यांना सांगून चांगलेच सुनावले. वीज गेल्यावर तुमचा कर्मचारी फोन उचलेल, असे आम्हाला तुम्ही लेखी लिहून द्या, असे नागरिकांनी सांगितले.
सहकार्य करण्याची विनंती
आज ७५ टक्के ग्राहक वेळेत बिल भरतात. कोरोना काळातही ग्राहकांनी वेळेत वीज बिल भरली होती. परंतु तुमचे कर्मचारी त्यांना उद्धट भाषेत उत्तरे देत असतील, तर ग्राहकांनी करायचे तरी काय, असा सवाल अमित सामंत यांनी केला. यावर पाटील याबाबत आपण कर्मचाऱ्यांशी बोलतो. असे सांगितले. ६ ते १५ जूनपर्यंत तुम्हा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. त्यानंतर सर्व सुरळीत होणार आहे. तुम्ही नागरिकांनी आपल्याला सहकार्य करा, अशी विनंती विनोद पाटील यांनी नागरिकांना केली.